सामाजिक व शैक्षणिक न्यायाचे प्रतीक – राजर्षी छत्रपती शाहू महाराज

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या सामाजिक, शैक्षणिक,व आर्थिक कार्याद्वारे बहुजन समाजाला सुशिक्षित करण्याचे, जागृत करण्याचे व त्यांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कोणतीही तडजोड न करता आयुष्याच्या अखेरपर्यंत झटणारे थोर राष्ट्रपुरुष म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होय.
कोल्हापूर येथील (कागलच्या घाटगे घराण्यात) जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे आणि त्यांची पत्नी राधाबाईसाहेब या दांपत्याच्या पोटी राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला.त्यांचे मूळनाव यशवंतराव होते, राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. १८९४ साली वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानची सुत्रे हाती घेऊन राजे कायदेशीर वारसदार बनले, तेव्हापासूनच त्यांनी वेठबिगारीची पध्दत बंद करून राजांनी बहुजन समाजातील लोकांना संस्थानात नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. राजर्षी शाहू महाराज यांनाही स्वराज्य हवेच होते, परंतु खेड्यापाड्यातील सर्वसामान्य अठरापगड जाती, जमातीतील बहुजन जनता निरक्षरतेच्या गर्तेत अडकून अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड,सावकारशाहीचा जाच आणि भिक्षूकशाहीच्या लुटीत कंगाल होत असताना आणि पिढ्यानपिढ्या ज्यांना अस्पृश्य लेखून त्यांना सामाजिक, शैक्षणिक,व आर्थिक अशा सर्व स्तरातील हक्क अधिकारांपासून बहिष्कृत केले गेले असताना त्यांना शिक्षण देणे महाराजांना महत्वाचे वाटत होते. कारण शिक्षणानेच लोक सुशिक्षित होतील त्यांची मनं तयार होऊन त्यांना आपल्या हक्क अधिकाराची जाणीव होईल व तेही या भावी स्वराज्यात पुढारलेल्या वर्गाच्या बरोबरीने अधिकार मिळविण्यासाठी सक्षम होतील, अन्यथा मूठभर उच्चवर्णीय लोकांच्या हातात सत्ता जाऊन इतर बहुजन समाजाला न्याय मिळणार नाही.त्यामुळे या स्वराज्याला काही अर्थच उरणार नाही, यासाठी महाराजांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन १९१६ साली कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे आदेश देऊन १९१७ साली कायदा करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.

शिक्षणाशिवाय राष्ट्राच्या विकासाला गती मिळणार नाही असे त्यांचे मत होते,याच दृष्टीने महाराजांनी विविध जाती धर्मातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांची गरज ओळखून शालेय शिक्षण सोयीस्कर व्हावे या हेतूने शिक्षणाबरोबरच विविध वसतिगृहांची स्थापना देखील केली.त्यामधे राजाराम हॉस्टेल (१९०१) दिगंबर जैन वसतिगृह (१९०२) याच जैन वसतिगृहात शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील हे १९०२ मधे त्यांच्या शिक्षणादरम्यान वास्तव्यास होते. १९०२ ते १९०९ या कालावधीत भाऊराव पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचे सुधारणा चळवळीतील कार्य प्रत्यक्ष पाहिले होते. राजवाड्यावर राहिल्यानंतर महाराजांच्या विशाल अंत:करणाचा अनुभवही घेतला होता. कोल्हापूरातील महाराजांच्या सानिध्याने भाऊरावांस सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी भक्कम प्रेरणा मिळाली आणि नंतरच्या काळात भाऊराव पाटील यांच्या रुपाने एक निष्काम कर्मयोगी, समाजसुधारक व शिक्षणमहर्षी या महाराष्ट्राला लाभला.
व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग (१९०१) वीरशैव लिंगायत बोर्डिंग (१९०६) मुस्लिम बोर्डिंग (१९०६) नामदेव बोर्डिंग अशी विविध वसतिगृह स्थापन केली. सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने जुलै १९१७ मधे पुनर्विवाह व विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत केला. १९१८ साली आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत केला विशेष म्हणजे स्वतःच्या घराण्यातील ( चुलत बहीण) इंदोरच्या होळकर या धनगर घराण्याची सून बनविली. उक्ती प्रमाणे प्रत्यक्ष कृती करुन महाराजांनी नवा सामाजिक आदर्श समाजापुढे ठेवला ही खरोखरच उल्लेखनीय बाब होती. १९१८ साली पारंपरिक कुळकर्णी पध्दती रद्द करुन संस्थानात तलाठी शाळांची स्थापना केली व त्यावर पगारी तलाठ्याची नेमणूक केली.१९१८ साली दलितांना हिण लेखून त्यांचा सामाजिक दर्जा मलिन करणारी महार वतने रद्द केली. १९१९ मधे स्त्रियांना क्रुरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा संमत केला, शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राधानगरी हे धरण वसविले. शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी सहकारी सोसायटी बाजारपेठ स्थापली.
वेदोक्त प्रकरण राजर्षी शाहूंच्या जीवनात तसेच आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीत महत्वाचे होते, ऑक्टोबर १८९९ मधे महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी गेले असता त्यांच्या स्नानावेळी नारायण भटजी मंत्र म्हणत होते, भटजी स्नान न करताच वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होते. वैदिक मंत्र हे केवळ क्षत्रियांसाठी असून महाराज क्षत्रिय नाहीत अशी गरळ त्या भटांनी ओकली. त्यानंतर महाराजांनी त्यास चूक सुधारण्याची संधी देऊन घराण्यातील सर्व विधी व संस्कार वेदोक्त पद्धतीने करण्यास सांगितले परंतु तरीही भट व राजोपाध्ये यांनी आदेश पाळले नाहीत.अशा ब्राह्मण भेदनीतीला टिळकांनी राजांच्या विरोधात ब्राह्मणांची बाजू घेतली होती ही खरोखरच चिड आणणारी बाब होती. या ब्राह्मण्य लादणाऱ्या विचारांना पायदळी तुडवून १९०५ साली राजर्षी शाहू महाराजांनी यांचे सर्व वंशपरंपरागत हक्क काढून घेऊन त्यांचे इनाम जप्त केले.
पुरोहितांची शाळा काढून विविध जाती-जमातीतील नवे पुरोहित निर्माण केले. ऑक्टोबर १९२० साली महाराजांनी कोल्हापूरातील शंकराचार्याचे पीठ रद्द करुन क्षात्रजगतगुरुचे नवे पीठ निर्माण केले,व या क्षात्रजगतगुरु पीठावर सदाशिवराव पाटील-बेनाडीकर या मराठा समाजातील व्यक्तीची निवड केली.ब्राह्मणांची सर्वच क्षेत्रात असलेली मक्तेदारी मोडीत काढून १९०२ साली राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा देशातील पहिला क्रांतीकारी निर्णय घेतला. बहुजन समाजाला सन्मानाने व्यापार, उद्योगधंदे, करुन स्वतःचा विकास करता यावा यासाठी सहकार्य करुन योजना राबविल्या.

महाराजांना विविध कलांचे छंद होते, शिकार, मल्लविद्या, संगीत, नाट्य,चित्रपट चित्रकला इत्यादी कलांना त्यांनी आश्रय दिला. जगभरातील तत्वज्ञानी साहित्य ग्रंथ ते वाचत व चिंतन करत असल्याने ते विचारशील होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या ‘ माझी जीवनगाथा ‘ या पुस्तकामधे उल्लेख केलेला किस्सा येथे नमूद करावासा वाटतो तो असा की, साधारण १९२१ सालची गोष्ट असेल प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि राजर्षी शाहू महाराज यांची महाराज मुंबईला आले असता पन्हाळा लॉजवर भेट झाली होती.या भेटीदरम्यान इतर विषयांवर चर्चा चालू असताना महाराजांनी प्रबोधनकार ठाकरेंना विचारले की सध्या कोणते पुस्तक लिहित आहेत? यावर प्रबोधनकार ठाकरेंनी भिक्षूकशाहीचे बंड लिहित आहे असे सांगताच महाराज म्हणाले सॅव्हेलचा प्रीस्टक्राफ्ट ॲण्ड किंगक्राफ्ट हा ग्रंथ नाही तुमच्याजवळ ? वा,वा, तो तर प्रथम अभ्यासला पाहिजे आणि अमेरिकेतील आर.पी.ए.सीरीजची पुस्तके चांगली अभ्यास करा. इंगरसॉल्स रायटिंग्ज ॲण्ड स्पीचेस तर नेहमीच अभ्यासात असली पाहिजे. अशा कितीतरी संदर्भ ग्रंथांची नावे महाराज भडाभड सुचवीत होते. कित्येक पुस्तकातले काही महत्वाचे इंग्लिश परिच्छेद त्यांनी प्रबोधनकारांना तोंडी सांगितले, वरवर पाहणारांना महाराज अडाणी नि हेंगाडे वाटले तरी त्यांच्या परिपक्व ज्ञानाचा मागमूस इतरांना सहसा लागत नसे.या क्षणाला प्रथमच महाराजांच्या व्यापक ज्ञानसंग्रहाचा प्रबोधनकारांना साक्षात्कार झाला व ते चाट पडले.महाराजांनी सांगितलेल्या संदर्भ ग्रंथांपैकी प्रबोधनकारांकडे एकही ग्रंथ नव्हता यावर महाराजांनी मुंबईतील काही ठराविक बुकसेलरकडून प्रबोधनकारांना ग्रंथ उपलब्ध करून देऊन त्याचे बील दरबारी पाठवून द्या असे सांगून स्वतः भरले. इतकेच नव्हे तर प्रबोधनकारांना त्यांच्या भिक्षूकशाहीचे बंड या पुस्तकाच्या जादा २ हजार प्रती छापण्यास सांगून ५ हजार रुपये देऊ केले व त्या प्रती नंतर महाराजांनी स्वराज्यातील दौऱ्यात ठिकठिकाणच्या वाचनालयांना वाटल्या.
महाराजांनी अशिक्षित बहुजन बांधवांना जागृत करण्यासाठी सत्यशोधक जलशांची कल्पना काढली व त्याद्वारे बहुजनांना शिक्षणाची आवश्यकता, सामाजिक नि धार्मिक अनैतिक रुढींचा फोलपणा, भिक्षूकांनी गावोगाव चालवलेली लूटमार, लग्नकार्यातील अनाठायी खर्च, मारवाडी व सावकारी करणारे यांनी लोकांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन त्यांची शेतीवाडी, घरेदारे, गुरेढोरे, स्वाहा करण्याचे चालविलेले कायदेशीर कारस्थाने इत्यादी अनेक विषयांवर प्रहार करून जागृतीचा संदेश सर्वदूर पोहोचवला.हा सत्यशोधक जलशांचा प्रयोग खेडूती जनसमुदायाच्या न्यूनगंडांच्या निर्दाळणाला फलदायी ठरला. १९२० साली विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता ओळखून त्यांच्या ‘मूकनायक ‘ वृत्तपत्रासाठी आर्थिक सहाय्य केले.
मार्च १९२० मधे कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथील दलितांच्या ऐतिहासिक परिषदेत भाषण करताना राजर्षी शाहूंनी म्हटले होते की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे तुमचेच नाही तर अखंड राष्ट्राचे नेते होतील आणि तेच तुमचा उद्धार करतील तेव्हा आपण सर्वांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व मान्य करण्याचे आवाहन केले.व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या क्रांतीकारी कार्याने महाराजांच भाकीत खर ठरवलं.१८९४ ते १९२२ ही महाराजांची कारकीर्द कोल्हापूर संस्थानालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारी ठरली.
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी त्यांच्या सुधारवादी कार्यातून आपल्याला आज दिसते. महाराजांनी बहुजनांच्या, वंचितांच्या सक्षमीकरणासाठी, उद्धारासाठी जे कार्य केले ते अलौकिक होते आणि आजही ते बहुजनांना हक्क आणि अधिकारांच्या लढाईत नैतिक बळ तर देतेच शिवाय शासनकर्त्यांना राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ घालून देते.अशा प्रजाहितदक्ष लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!
✍️ समाधान दणाने , मो.७२१८८४४६५२

