सामाजिक संदेश देत जेऊरमध्ये भारत प्रायमरी स्कूलची बालदिंडी उत्साहात

करमाळा (प्रतिनिधी) :जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल व भारत मॉन्टेसरीच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. भक्तिभावासोबतच स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, समता, समानता, सेवाभाव आणि संस्कृती-परंपरेचे महत्त्व सांगणारे सामाजिक संदेश देत ही दिंडी संपूर्ण जेऊर गावातून काढण्यात आली.
दिंडीची सुरुवात संस्थेचे सचिव अर्जुन सरक यांच्या हस्ते विठुरायाच्या पालखीचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्राचार्य गोकुळ पाटील व पर्यवेक्षक रविकिरण वाघमोडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली विठुरायाची आकर्षक पालखी दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरली.

विद्यार्थ्यांनी हातात विविध सामाजिक संदेश असलेले बॅनर घेतले होते. स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन यांसह सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी खास वारकरी वेशभूषा परिधान केली होती. मुलांनी पांढरा शर्ट व पांढरी विजार, तर मुलींनी साडी परिधान केल्याने दिंडीला पारंपरिक स्वरूप प्राप्त झाले.
हरिनामाचा गजर, भक्तिगीते आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी भक्तिगीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ग्रामस्थ व पालकांनीही दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दिंडी दरम्यान शिक्षिका अनिता देशमुख व शिक्षक अंगद पठाडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. प्रतिष्ठित व्यापारी संजय कुमार दोशी यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले, तर संस्थेचे उपाध्यक्ष संजय कुमार दोशी यांनी दिंडीचे स्वागत केले. अजय कुमार सोळंकी यांनीही विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.
बालदिंडी यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, भारत प्रायमरी स्कूल व भारत मॉन्टेसरीचे सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच संस्थेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बालदिंडीचे योग्य नियोजन व यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार नारायण पाटील, उपाध्यक्ष राजू शेठ गादिया, सचिव अर्जुन सरक व संचालक पृथ्वीराज पाटील यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.


