करमाळा/संदेश प्रतिनिधी करमाळा,ता.३१: येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. तेजस्विनी मंडलीक यांनी बी.ए. (इंग्रजी) विषयात अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे. तीला अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षांत समारंभात राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
तेजस्विनी मंडलीक अत्यंत सामान्य कुटुंबातून असूनही त्यांनी जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. या यशाबद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने म्हणाले, “तेजस्विनीचे हे सुवर्ण यश तिच्या परिश्रमाबरोबरच तिचे शिक्षक आणि विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांचे आहे. त्यांनी उपलब्ध करून दिलेले शैक्षणिक वातावरण आणि मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे आमच्या विद्यार्थिनीने विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला.” तेजस्विनीच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल यशवंत परिवाराने तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड, प्रा. खरात, प्रा. मुळीक आणि सर्व प्राध्यापक वृंद यांनी तिचे कौतुक केले.
तेजस्विनी मंडलीक हीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ स्तरावर उंचावले आहे. तिचे हे यश संपूर्ण महाविद्यालयासाठी प्रेरणादायी आहे. तिचा आदर्श घेऊन भविष्यात आणखी विद्यार्थी अशा प्रकारचे यश मिळवतील. विलासराव घुमरे, सचिव- विद्या विकास मंडळ , करमाळा.