पावसाअभावी खरीप पिके जळू लागली; हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

करमाळा(प्रतिनिधी):ऑगस्ट महिना संपत आला असतानाही पावसाने दडी मारल्याने करमाळा तालुक्यात खरीप हंगामातील उडीद, तूर, मूग, बाजरी यांसह विविध पिके पाण्याअभावी सुकून जळू लागली आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषिमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांची उगवण चांगली झाली होती. मात्र, त्यानंतर आवश्यक प्रमाणात पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. अनेक भागांतील विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने पिकांना पाणी देणेही शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी उडीद, तूर, मूग, बाजरी आदी पिके सुकून करपण्यास सुरुवात झाली आहे.
पिकांची वाढ खुंटण्याबरोबरच काही ठिकाणी मावा व करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिके वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या माध्यमातून पाळी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जलस्रोतांची पाणीपातळी खोल गेल्याने अनेकांना पाणी देणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर उभी पिके मोडून टाकण्याची वेळ आली आहे.
पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते, औषध फवारणी व मजुरी यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच शेतीसाठी घेतलेले कर्ज, उसनवारी आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी करावी व नुकसानग्रस्त खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करावेत. पंचनाम्यांमध्ये नुकसानीची योग्य नोंद करून पात्र शेतकऱ्यांना शासन नियमानुसार नुकसानभरपाई व आर्थिक मदत मिळवून द्यावी. तसेच संबंधित शेतकऱ्यांना पीकविमा व शासनाच्या इतर उपलब्ध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी हे लेखी निवेदन नायब तहसीलदार विजय लोकरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषिमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
निवेदनावर पोथरे ग्रामपंचायत सदस्य रघुवीर जाधव, माजी सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे, भाजपचे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नितीन झिंजाडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, संदीप नंदरगे, संतोष साळुंखे, दयानंद रोही, दिगंबर झिंजाडे, नाना शिंदे, बापूराव गोसावी, दत्तात्रय आढाव, सुभाष शिंदे, नामदेव शिंदे, दत्ता हिरडे, संजय शिंदे, बाळासाहेब खराडे, पत्रकार हरिभाऊ हिरडे, विवेक कुलकर्णी, ऋषीकेश रणवरे, महादेव शिंदे, शांतीलाल जाधव, सागर झिंजाडे यांच्यासह पोथरे ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



