
करमाळा(प्रतिनिधी) : हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने करमाळा शहरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात ही रॅली संपन्न झाली. जीन मैदान येथून रॅलीला सुरुवात झाली. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तिरंगा हातात घेऊन मोठ्या संख्येने युवक, नागरिक, माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीच्या मार्गावर व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅलीवर पुष्पवृष्टी करून तिरंग्याला मानवंदना दिली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रॅलीतील नागरिक व माजी सैनिकांना संबोधित केले. देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा विषय असून देशप्रेमाची भावना प्रत्येकाच्या मनात कायम जागृत राहिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे यांनीही उपस्थितांना देशप्रेमाविषयी मार्गदर्शन केले.

रॅलीत करमाळा तालुक्यातील अनेक माजी सैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान करून त्यांच्या त्यागाला अभिवादन करण्यात आले.
जीन मैदान येथून सुरू झालेली रॅली करमाळा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत श्री देवीचा माळ येथील अथर्व मंगल कार्यालय येथे पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

या भव्य तिरंगा बाईक रॅलीचे नियोजन भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी सैनिक, युवक, व्यापारी तसेच करमाळा शहरातील नागरिकांनी सहकार्य केले. रॅलीमुळे शहरात दिवसभर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

