करमाळा तालुक्यात खरीपाची पेरणी १४ हजार ४५ हेक्टर पूर्ण
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यात यावर्षी पावसाने उशीरा सुरूवात केली तरीही शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी सरासरी (१४०४९ हे. सरासरी) इतकी म्हणजे १४ हजार ०४५.६० हेक्टर केली आहे. यात सर्वात जास्त पेरणी उडीद या तृणधान्याची ६८२६.३० हेक्टर झाली आहे. यावर्षी १५ जुलै पर्यंत १९२.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सर्वात जास्त पाऊस जेऊर मंडल मध्ये २८८.६० मिलीमीटर तर सर्वात कमी पाऊस कोर्टी मंडल मध्ये १०१.१० मिलीमीटर झाला आहे. खरीपाच्या पेरणीमध्ये बाजरी १२४ हेक्टर, मका २५८४ हेक्टर पेरणी झाली आहे. तृणधान्यामध्ये तूर ४०९२.६० हेक्टर, उडीद ६८२६.३० हेक्टर, मुग १६६ हेक्टर, भुईमूग १० हेक्टर, सूर्यफुल २०२ हेक्टर, सोयाबीन ३३.७० हेक्टर अशाप्रकारे खरीपाची १४०४५.६० हेक्टरची पेरणी झाली आहे. ही पेरणी म्हणजे सरासरीच्या ९९ टक्के झालेली आहे.
यावर्षी तालुक्यात पाऊस उशीरा आला. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या. तरीही शेतकऱ्यांनी जवळपास सरासरी एवढी पेरणी केलेली आहे. यापुढे शेतकयांनी मुग व उडीद या कडधान्याची पेरणी करू नये. त्याला उतार मिळणार नाही. परंतू अजूनही तूर व बाजरी याची पेरणी करू शकता. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळपिकाला शंभर टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी सहाय्यकांकडे जॉब कार्ड, सातबारा उतारा व ८ अ चा उतारा घेऊन संपर्क करावा. तसेच सामुदायिक शेततळ्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरावेत.…संजय वाकडे (तालुका कृषी अधिकारी, करमाळा)