शाश्वत विकास ही काळाची गरज - Saptahik Sandesh

शाश्वत विकास ही काळाची गरज

✍️ धनंजय पन्हाळकर

2022 हे वर्ष युनेस्कोने “शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान” या संकल्पनेवर आधारित उपक्रम करून साजरे करायचे ठरवले आहे शाश्वत विकास म्हणजे काय हे सुरुवातीला पाहूया कमी कष्टामध्ये चांगल्या सुविधा मिळण्यासाठी विविध तंत्रज्ञान याचा वापर करून दैनंदिन गरजा पूर्ण केल्या जातात व त्या करत असताना पुढच्या पिढीला देखील निसर्गातील स्रोत शिल्लक ठेवणे आवश्यक असते याला शाश्वत विकास असे म्हणतात.  शाश्वत विकासामध्ये पक्षांचे महत्त्व स्थान कसे आहे हे पाहणार आहोत.

पर्यावरणाच्या अन्नसाखळीमध्ये  जे महत्त्वाचा घटक आहेत त्यापैकी एक म्हणजे चिमण्या होय. चिमण्यांचे संवर्धन व पर्यावरणातील महत्त्व हा विषय आपला पुढे मांडत आहे. मी 15 वर्षांपूर्वी एक लाकडी बॉक्स तयार केला व घराच्या गॅलरीमध्ये बांधला , चिमण्या आत जाण्यासाठी छोटासा दरवाजा ठेवला होता थोड्या दिवसांनी चिमण्यांनी गवत पालापाचोळा त्याच्या साह्याने त्या बॉक्समध्ये घरटे तयार केले कालांतराने अंडी घातली थोड्या दिवसात त्या बॉक्स मधून चिऊ चिऊ असा आवाज  येऊ लागला मी मोबाईलच्या साह्याने आत मध्ये फोटो काढला पाहतो तो काय लहानशी तीन पिल्ले तोंड वासून अन्नाची वाट पाहत होती. यानंतर मी त्या घरट्याकडे कधीही गेलो नाही कालांतराने पिल्ले मोठी झाली आणि दोन दिवस पिल्लांना मोठ्या चिमण्यांनी  उडण्याचे प्रशिक्षण दिले नंतर ती पिल्ले आकाश मध्ये भरारी घेऊन निघून गेली.

काही कालावधी गेल्यानंतर परत दुसऱ्या चिमण्यांची जोडी त्या घरट्यापाशी आली परंतु घरट्यामध्ये भरपूर गवत असल्यामुळे त्यांना बसण्याचा अडचण होत होती मी ते घरटे खोलून पुन्हा साफ केले नंतर दुसऱ्या चिमण्यांच्या जोडीने गवत काडी आणून घरटे तयार केले परंतु याच कालावधीत रॉबिनची जोडी माझ्या घराच्या परिसरात आली आणि त्यांनी आयत्या चिमण्यांच्या घरट्यावरती आक्रमण करून स्वतः अंडी घालून तीन पिल्लांना जन्म दिला त्याचे मी व्हिडिओ शूटिंग केले रॉबिन पक्षाने केलेल्या आक्रमण जणू काही स्वतःच्या अस्तित्वासाठी इतर प्रजातीवर केलेल्या आक्रमण असे मला वाटले.

मी चिमण्यांच्या आकारांचा अभ्यास केला आणि नंतर साध्या चिमण्या साठी पुठ्ठ्याच्या बॉक्सचे एक घरटे केले त्याचे प्रवेशद्वार अतिशय लहान केले त्याचबरोबर साईडच्या बाजूने बाहेर पडण्यासाठी एक झरोके ठेवले . आता या घरट्यामध्ये रॉबिन पक्षाला प्रवेश करता येत नव्हता कारण घरट्याचे प्रवेशद्वार त्याच्या आकारापेक्षा लहान होती . काही दिवसानंतर चिमण्या नवीन घरट्यामध्ये पालापाचोळा गोळा करून अंडी घालून पिलांना जन्म दिला व त्यांचे पालन पोषण केले . त्या दोन घरट्याच्या परिसरात पाकोळी पक्षाने मातीचे घरटे तयार करण्यास सुरुवात केली अतिशय प्रयत्नातून पाकोळी पक्षाने मातीचे घरटे तयार केले त्यांच्या लाळेतील विशिष्ट द्रव्यामुळे मातीचे घरटे पाकोळी पक्षी तयार करतात या घरट्यांची तस्करी देखील केली जाते कारण बाहेरच्या देशामध्ये या घरट्याचं सूप तयार करून पितात. माझ्या हे वाचण्यात आले होते मी या घरट्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला घरटे पूर्ण झाले.

आता त्यामध्ये पाकोळ्या अंडी घालणार एवढ्यात साध्या चिमण्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले पाकोळ्या घराच्या जवळ आल्या की साध्या चिमण्या त्यांच्याशी भांडण करत व त्यांना पळून लावत काही दिवसानंतर पाकळ्यांचे येणच बंद झालं मग साध्या चिमण्यांनी पाकळ्यांनी केलेल्या घरट्याचं प्रवेशद्वार मोठे करण्याचा प्रयत्न केला कारण पाकळ्यांचा आकार लहान असल्यामुळे त्यांनी तयार केलेल्या घरट्याचे प्रवेशद्वार अतिशय लहान होते दोन-चार दिवसात चिमण्यांनी त्या घरट्याचे प्रवेशद्वार मोठे केले आणि परत पालापाचोळा आणून आत मध्ये स्वतःसाठी अंडी घालण्यास अनुकूल वातावरण केले आणि थोड्या दिवसात याच्यातून देखील तीन पिल्लांनी उंच आकाशात भरारी घेतली परंतु पाकोळी या पक्षांना ऐन वेणीच्या काळात घरटे सोडावे लागले याचे मला दुःख वाटले.

काही कालानंतर जिन्याच्या खालच्या बाजूला पाकोळ्याने स्वतंत्र घर केले आणि त्या ठिकाणी अंडी घालून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी पिल्लांचे संगोपन केले व थोड्या दिवसात पिल्लांनी हवेत उंच भरारी घेतली. मित्रहो या तीन प्रजातींचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की मानवाप्रमाणे पशुपक्षांमध्ये देखील शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जातो प्रत्येक प्रजाती ही आपले अस्तित्व टिकवण्यासाठी इतर प्रजाती वरती आक्रमण करते आज माझ्या घराच्या परिसरामध्ये मला साधी चिमणी ,रॉबिन व पाकोळी या रोज दिसतात आणि त्या परिसरातील कीटकांचे भक्षण करतात मी झाडाला पाणी देत असताना जमिनीतून उडणारे बारीक कीटक रॉबिन अलगद टिपतो कधी कधी तो माझ्या खांद्यावर देखील बसतो एवढी माझी आणि पक्षांची मैत्री निर्माण झाली आहे.

या पक्षांना कुठलंही अन्न देण्याची गरज नाही फक्त पाण्याची सुविधा मात्र परिसरामध्ये मी केलेली आहे त्यामध्ये अनेक पक्षी पाणी पितात व अंघोळ देखील करतात ते पाण्यात अतिशय आनंद होत होत आहे .आज जास्त उत्पादन घेण्यासाठी मानव कीटकनाशकाची फवारणी करत आहे त्यामुळे अशा पक्षांचे भक्ष्य कीटक नष्ट होऊ लागले आहे त्यामुळे अशा पक्षांचा अधिवास शहरीकरणाकडे वळला आहे परंतु शहरीकरणांमध्ये देखील उंच टॉवर, विद्युत खांब या अनेक समस्यामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

शेतकरी देखील पारंपारिक शेती सोडून जास्त पैसा मिळेल अशा प्रकारची पिके घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंचनाच्या सोयी झाल्यामुळे तृणधान्य न लावता ऊस कापूस केली व फळबागा अशा पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे. ज्वारी बाजरी गहू भात नाचणी तसेच वेगवेगळी कडधान्य पिकवण्याचा शेतकरी प्रयत्न करत नाही त्यामुळे चिमण्यांना दाणे टिपण्याची संधी मिळत नाही. चिमण्या या कीटक भक्षी असल्यामुळे दाणे टिपण्याबरोबर पिकावर पडलेली कीड देखील त्या नष्ट करत असत त्यामुळे कोणत्याही प्रकारची फवारणी करावी लागत नव्हती आत्ता चिमण्यांची संख्या कमी झाल्यामुळे प्रत्येक पिकावरती कीटकनाशकाची फवारणी करावी लागते आणि हीच कीटकनाशके जमीन आणि पाणी प्रदूषित करतात.

शाश्वत विकास करत असताना पर्यावरणातील महत्त्वाचे दोन घटक म्हणजे हवा व पाणी हे जर प्रदूषित केले तर पुढच्या पिढींना याचे परिणाम भोगावे लागतील म्हणून यावर्षी युनेस्कोने शाश्वत विकास करत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी योग्य पद्धतीने करावा ही संकल्पना आपणापुढे ठेवली आहे त्याचाच एक भाग म्हणून मी हा छोटासा उपक्रम राबवत आहे. निसर्गातील एक घटक नामशेष होऊ नये यासाठी मी हा छोटासा प्रयत्न केला आहे .अशी कृती सर्वांनी केली तर निसर्गाचा समतोल राहील व 2022 हे साल शाश्वत पर्यावरण संवर्धनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यावरील उपक्रम म्हणून चिमणी संवर्धन हा देखील होऊ शकेल.

लेखक – प्रा. धनंजय विठ्ठल पन्हाळकर, मो.9423303768,श्रीमती न.शा॑. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड जिल्हा सिंधुदुर्ग

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!