सत्यशोधक - Saptahik Sandesh

सत्यशोधक

एकोणिसाव्या शतकात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी करुन मनुवादी व्यवस्थेला हादरा देणारे बहुजन उध्दारक,क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला होता. त्यांचे मूळगाव कटगुण जिल्हा सातारा हे होते, जोतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत त्यामुळे गोऱ्हे हे आडनाव मागे पडून ते समतेचे फुले बनले.

तत्कालीन ब्राह्मणमंडळी, सनातन्यांनी आपले हक्क अबाधित राहावेत म्हणून मनुस्मृतीच्या संहितेवर आधारित वर्णव्यवस्था टिकवली होती व त्याद्वारे धार्मिक कर्मकांड,पूजा अर्चा, करून द्रव्यसंचय करुन अंधश्रद्धा पसरवून पाखंड निर्माण करुन बहुजनांना सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, व ईतर सर्व क्षेत्रात गुलाम करून ठेवले होते. याच पाखंडी,ब्राह्मणी,जातिभेद, वर्णभेद माणसामाणसात भेद निर्माण करणाऱ्या व्यवस्थेच्या नांग्या ठेचण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं होत. तत्कालीन समाजात जातीवाद,क्रूर प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा यांनी थैमान घातलं होतं याला आळा घालण्यासाठी एक समतेच वादळ,समतेच फुल उगवले होते ते म्हणजे महात्मा जोतिबा फुले होय. बहुजनांना या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी महात्मा फुलेंनी १८४८ साली पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. विशेष बाब म्हणजे ज्या ब्राह्मणमंडळींनी सनातन्यांनी महात्मा फुलेंच्या सामाजिक सुधारणेला विरोध केला होता त्यांच्या समाजातील स्त्रियांना,मुलींना सुध्दा महात्मा फुलेंनी शिक्षण दिले होते.

तसेच पुढे १८५२ साली अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या बहुजन समाजातील मुलांसाठी शाळा सुरू केली होती. अशा अनेक शाळा महात्मा फुलेंनी पुण्यातील वेगवेगळ्या पेठेत सर्व जाती धर्मातील मुलांसाठी सुरू केल्या होत्या. त्यांच्या या कार्याला शिक्षक मिळू नयेत म्हणून भटांनी खूप प्रयत्न केले होते याच्याही पलीकडे जाऊन भटांनी महात्मा फुले यांना जीवे मारण्यासाठी रोडे, कुंभार रामोशी पाठवले होते पण तेही या जोतिबा फुलेंच्या सत्यशोधक कार्याला नतमस्तक होऊन महात्मा फुलेंची अनुयायी बनले. महात्मा फुलेंनी या शैक्षणिक कार्यासाठी सावित्रीमाई फुले यांना आधी शिक्षित केले आणि पुढे जाऊन सावित्रीमाई फुलेंनी न डगमगता,न घाबरता बहुजनांना शिक्षण देण्याचे कार्य सुरळीत पार पाडले होते, त्यांनासुद्धा ब्राह्मणमंडळी भटांनी शारीरिक मानसिक त्रास दिला दगडधोंडे,शेणाचे मार दिले तरीही सावित्रीमाई फुलेंनी खंबीरपणे महात्मा फुलेंच्या या सुधारणावादी कार्यात सातत्याने कार्यरत राहून महात्मा फुलेंना शेवटपर्यंत साथ दिली.

१८६८ साली महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद बहुजनांसाठी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या आपल्या बांधवांसाठी खुला केला होता, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठीही महात्मा फुलेंनी ब्रिटिश सरकारकडे मागण्या मांडल्या होत्या त्यामधे त्यांनी तलाव,बंधारे,धरणे, बांधून शेतीला योग्य पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी सूचना केली होती,तसेच त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देऊन अल्पव्याजी कर्ज द्यावे, त्यांच्याकडून जो सारा वसूल केला जातो त्या पैशातून त्यांच्या मुलांना शिक्षण द्यावे अशाही सूचना दिल्या होत्या.१८६५ साली विधवांच्या केशवपन बंदीसाठी महात्मा फुलेंनी न्हाव्यांचा संप घडवून आणून ही क्रूर प्रथा बंद पाडली. भटांच्या खोट्या धार्मिक भितीला मनसुब्यांना व्यभिचाराला स्त्रिया बळी पडत होत्या अशा विधवांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी जोतिबांनी १८६३ साली स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले होते. काशीबाई या विधवेच्या मुलास दत्तक घेऊन त्यांचे उत्तम रितीने पालनपोषण केले होते, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पेशवाईत दुर्लक्षित झाली होती ती महात्मा फुलेंनी निदर्शनास आणून त्याची श्रध्देने जोपासना करुन पुढे सरकारने या समाधीची व्यवस्था घ्यावी यासाठीही ब्रिटीशांना अर्ज केला होता, तत्कालीन कोल्हापूर संस्थानातील बर्वे प्रकरणात टिळक आगरकरांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती त्यावेळी महात्मा फुलेंनीच टिळकांना जामिनासाठी १० हजार रुपयांची मदत केली होती.व नंतर टिळकांची तुरुंगातून सुटका झाल्यावर सुध्दा त्यांचा जाहिरपणे सत्कार केला होता, तरीही पुढे महात्मा फुले यांच्या निधनाची साधी वार्ता सुध्दा या टिळकांनी आपल्या केसरी व मराठा वृत्तपत्रात दिली नाही किती हा जातीद्वेष,वर्णद्वेष म्हणावा.

जोतिबा फुलेंनी ईश्वराला निर्मिक असे संबोधले होते ते एकेश्वरवाद ईश्वराला मानणारे होते,समतेवर आधारीत मानवधर्माचा जोतिबांनी पुरस्कार केला होता, आपल्या लिखाणाच्या माध्यमातूनही महात्मा फुलेंनी तत्कालीन समाज व्यवस्थेचा बुरखा टराटरा फाडला होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा “कुळवाडीभूषण” या नावाने पहिला पोवाडा लिहिला होता. १८६९ साली ब्राह्मणांचे कसब या पद्यात्मक ग्रंथातून महात्मा फुलेंनी संधीसाधू ब्राह्मणांच्या कारवायांवर प्रकाश टाकला होता, गुलामगिरी या ग्रंथात ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीपासून ते भटपांड्यांचा समग्र इतिहास स्पष्ट केला आहे बहुजनांनी हा ग्रंथ नक्की वाचावा. हा ग्रंथ महात्मा फुलेंनी गुलामांना दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेस समर्पित केला. “शेतकऱ्यांचा आसूड” या १८८३ साली लिहिलेल्या ग्रंथातून महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन केले आहे. शेतकऱ्यांचा सावकारशाही विरुध्दचा लढा जोतिबांनी यशस्वी केला होता.

‘सार्वजनिक सत्यधर्म’ यामधे निर्मिकाची ईश्वराची संकल्पना मांडली त्यांच्या मृत्यूनंतर हा ग्रंथ १८९१ साली प्रकाशित झाला होता. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद, अनिष्ट प्रथा, परंपरा यांना लाथाडून महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.महात्मा फुलेंच्या याच कार्यातून प्रेरणा घेऊन पुढील काळात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरू मानत सामाजिक क्रांती घडवून आणून आपल्या देशाला बहुमोल असे संविधान दिले ज्यामधे त्यांनी महात्मा फुलेंना अपेक्षित अशा समतावादी लोकशाहीवादी, तरतुदी राज्यघटनेत करुन ठेवल्या अशा या थोर बहुजन उध्दारक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना १९७ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!

✍️ समाधान दणाने करमाळा जिल्हा-सोलापूर – 7218844652

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!