करमाळा येथे बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले

करमाळा(दि.२७) – जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या प्रभारी उपअभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २० हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. आज (दि.२७) दुपारी चारच्या सुमारास सोलापूर येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या वतीने करमाळा येथे ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे एका कॉन्ट्रॅक्टरकडे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. करमाळा तालुक्यातील ३ विविध ठिकाणचे रस्ते सुधारण्याचे काम सदर कॉन्ट्रॅक्टरकडून करण्यात आले होते. या कामांपैकी एका कामाचे सुमारे ५,८७,८६१ रु.बिल तक्रारदार यांना प्राप्त झाले होते. सदर बिल काढण्याचा मोबदला तसेच उर्वरित दोन कामाचे प्राथमिक बिल काढण्याकरीता म्हणुन जिल्हा परिषदेच्या करमाळा बांधकाम विभागात शाखा अभियंता आणि प्रभारी उप अभियंता असलेले बबन हिरालाल गायकवाड (वय-५७ वर्षे) यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती गायकवाड यांनी २० हजार रु. लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले होते. गुरुवारी सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गायकवाड यांना रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (लाप्रवि, पुणे),अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे (लाप्रवि, पुणे ) आणि पर्यवेक्षण अधिकारी गणेश कुंभार (पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले (लाप्रवि, सोलापूर), पोलीस अंमलदार पोहेकॉ प्रमोद पकाले, पोकॉ राजु पवार, पोकों रवि हटखिळे, चालक पोकों शाम सुरवसे (सर्व नेमणुक ॲन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर) पार पाडली.

भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणा-या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.
- टोल फ्री क्रमांक १०६४
- दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८
- संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर.
- संकेतस्थळ – www.acbmaharashtra.gov.in
- ई-मेल : www.acbwebmail@mahapolice.gov.in
- ऑनलाईन तक्रार अँप – acbmaharashtra.net




