तडीपार केलेल्या आरोपीने केला आदेशाचा भंग – गावात येवून पुन्हा पळून गेल्याने गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 56 अन्वये काढलेल्या हद्दपार आदेशाचा भंग करुन सोलापुर जिल्ह्यातुन तडीपार असलेला व्यक्ती करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी या गावात येवून, पुन्हा पळून गेला त्याचा करमाळा पोलिसांनी पाठलाग केला परंतु हा व्यक्ती पळून गेल्याने त्याच्यावर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक चंद्रकांत भारत ढवळे यांनी करमाळा पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंदविली असून त्यात त्यांनी म्हटले कि, ३ जानेवारी रोजी मी व पोलिस कॉन्स्टेबल श्री.ताकभाते आम्ही दोघे करमाळा पोलीस ठाणे येथे हजर असताना माहितीदाराकडून यांचे मार्फत माहिती मिळाली आहे की, सोलापुर जिल्ह्यातुन तडीपार असलेला व्यक्ती तुकाराम नामदेव घोंगडे (रा.बिटरगाव वांगी ता. करमाळा जि.सोलापुर) हा बिटरगाव येथील राहते घरी असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने आम्ही वरिष्ठ पोलीस निरिक्षक जोतीराम गुंजवटे सो यांचे आदेशान्वये सदर व्यक्तीस पकडणे करिता खाजगी वाहनाने रवाना झालो.
आम्ही कंदर हद्दीतील बिटरगाव येथील त्याच्या राहते घराजवळ काही अंतरावर गाडी उभी करुन पायी चालत गेलो असता, घरासमोर तेथील खुर्चीवर एक व्यक्ती बसलेला दिसला त्या इसमाबाबत आम्ही खात्री केली असता तो तुकाराम नामदेव घोंगडे रा.बिटरगाव वांगी ता. करमाळा असल्याची खात्री झाली परंतु तो आम्हाला पाहुन त्याचे राहते घरापाठीमागुन पळुन गेला आहे.
तो पळुन जात असतांना आम्ही आमचे मोबाईल मध्ये व्हीडीओ शुटींग केलेली आहे. आम्ही त्याचा पाठलाग केला तो आम्हाला दिसून आला नाही. त्यानंतर आम्ही घराजवळील आजुबाजुच्या लोकांकडे तुकाराम नामदेव घोंगडे याचेबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की, सदर व्यक्ती हा बरेच दिवस झाले गावामध्ये येत आहे व आजही तो आला होता. त्यानंतर आम्ही या व्यक्तीच्या हद्दपारीच्या आदेशाबाबत करमाळा पोलीस ठाणेस चौकशी केली असता हा व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनीयम, 1951 चे कलम 56(1)(अ)(ब) अन्वये मा.उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग यांचे कडील आदेश क्र. क्रमांक/जबाबी/हद्दपार/एसआर/01/2022 दिनांक 28/09/2022 अन्वये सोलापुर व अहमदनगर जिल्ह्याचे हद्दीतुन एक वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करणेत आले आहे.
तसेच त्यास दिनांक 07/10/2022 रोजी हद्दपार बाबत नोटीस बजावली आहे. व सदर हद्दपार व्यक्ती याचे इच्छेनुसार त्यास मी स्वत: इंदापुर पोलीस स्टेशन जि. पुणे येथील त्याचे नातेवाईक याचेकडे तेथील प्रभारी अधिकारी यांचेमार्फतीने पाठवुन देण्यात आले होते. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.