राजकारण.. बदलण्याची गरज - Saptahik Sandesh

राजकारण.. बदलण्याची गरज

तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका लवकरच सुरू होणार आहेत. काही जागा बिनविरोध निघाल्या तरी अनेक गावातून चुरस आहे. राजकारण म्हटलं की सत्तेसाठी धावपळ असते. राजकारणाशिवाय सत्ता नाही आणि सत्तेशिवाय राजकारणाला मजा नाही. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणावर उलट-सुलट चर्चा सुरू असतात. अनेकजण म्हणतात.. राजकारण हे सर्वसामान्यांचे काम नाही. तर कोणी म्हणतो, राजकारण हा पैशाचा खेळ आहे. कोण म्हणतो, राजकारण म्हणजे ज्याला चार गुंड सांभाळता येतात त्यांनी राजकारण करावे, इतरांचे काम नाही. राजकारण म्हणजे विशिष्ट लोकांची मक्तेदारी आहे. ज्यांची मक्तेदारी आहे अशांनीच राजकारण करावे व इतरांनी ते फक्त पहावे; असा बहुतेकांचा गैरसमज आहे.

खरंतर राजकारण हा असा विषय आहे की, तो धरता येत नाही आणि सोडता येत नाही आणि बाजुला टाकायचे म्हटलेत्तर बाजूला टाकता येत नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रत्येकजण राजकारणाशी जोडलेला असतोच. प्रत्येकाची राजकारणावर काही मते ठरलेली असतात. राजकारणात दोन गट असतात, जे प्रत्यक्षात निवडणुकीला उभे असतात ते आणि जे मत देतात ते असे दोन भाग पडतात.

वास्तविक पाहता राजकारण म्हणजे वेगळे काही नाही. लोकशाहीने समाजासाठी अधिकृत काम करण्याची दिलेली संधी आहे. माणूस हा समाजप्रिय असतो. प्रत्येकजण एकमेकासाठी काही ना काही करत असतो. काही लोक छोटे काम करतात तर काही लोक मोठे काम करतात. जे मोठ्या प्रमाणात काम करतात त्यांची दखल घेतली जाते. ते सत्ताकारणाकडे झुकतात आणि तेथून राजकारण सुरू होते. थोडक्यात राजकारण म्हणजे सत्ता हस्तगत करण्यासाठी राजकारणात ज्या खटपटी केल्या जातात त्याला राजकारण म्हटले जाते.

आपला देश स्वतंत्र नव्हता तेंव्हा देश स्वतंत्र होण्यासाठी जी चळवळ राबवली त्या चळवळीपासून ते स्वातंत्र्यानंतर सत्ता काबीज करण्यासाठी ज्या ज्या घडामोडी केल्या, त्याची नोंद राजकारणात झालेली आहे. फरक एवढाच की स्वातंत्र्यानंतर राजकारणात सत्ता ही केंद्रस्थानी आली. सत्तेतून व्यक्तीमत्वाचा विकास, आर्थीक उन्नत्ती, आपले हितचिंतक व परिसराचे भवितव्य बदलता येते; हे लक्षात आल्यावर सत्ता मिळवण्यासाठी अनेक मार्ग आाखले जावू लागले. त्यामध्ये काही धाडसी तर काही कुटील मार्ग निघाले. दुर्दैवाने कुटील कारस्थानाला सुध्दा राजकारण हाच शब्द जोडला, त्यामुळे राजकारण शब्दाला मलीनता आली आहे.

राजकारणात स्थिरावण्यासाठी व सत्ता हस्तगत करण्यासाठी अनेकजण अनेक पर्याय वापरतात. पुर्वी गांधीजी जेंव्हा हा देश स्वतंत्र व्हावा म्हणून झगडत होते, तेंव्हा ते नेते असूनही त्यांनी सर्वसामान्यांची दुरावस्था पाहून अंगावर फक्त पंचा घेतला. दिन, दुःखीतांच्या दारात ते स्वतः गेले. त्यांना कधीही माझ्यावर विश्वास ठेवा; असे म्हणावे लागले नाही. स्वतःच्या जगण्यातून त्यांनी सर्वसामान्यांचा विश्वास कमवला व टिकवला. अर्थातच यासाठी किंमत चुकवावी लागते. अलीकडे राजकारणाला ओंगळवाणे स्वरूप आले आहे. राजकारण करायचे म्हटलेतर पदरी काही गुंड पाळावे लागतात, स्वतःच्या नावाची दहशत बसवावी लागते, दोन नंबरचे धंदे असावे लागतात. त्यातून कार्यकर्तेपोसले जातात. तेच निवडणुकीवेळी समाजसेवक म्हणून मिरवतात. निवडणुकीच्या काळात मतदारांना पैसा, दारू, पार्टी,पाहिजे त्या सर्व गोष्टी पुरवायच्या ही परंपरा सुरू झाली आहे.

मत मिळवताना सर्वसामान्यांचे पाय धरायचे व सत्ता येतातच मतदारांचे पाय ओढायचे हे सुत्र जवळपास सर्वत्र रूढ झाले आहे. निवडणुकीत पैसा पेरायचा आणि सत्ता मिळताच त्याच्या दुप्पट उगवायचा. अनेकांनी राजकारण हा पैसे कमवायचा धंदाच बनवला आहे.

राज्यातील व देशातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे उमेवारी अर्जा
सोबत उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र पाहिलेतर लक्षात येते, की गेल्या पाच वर्षापुर्वी नेत्याच्या उत्पन्नापेक्षा पुढच्या पाच वर्षात दुप्पट-चौपट वाढ झाली आहे. कोणाची नावे घेण्याची गरज नाही. अनेकांना राजकारण म्हणजे परीसस्पर्श वाटत आहे. राजकारणात आले, की प्रचंड संपत्ती जोडता येते. सहज एक उदाहरण पहायाला हरकत नाही.

उत्तरप्रदेशातुन एक फाटक्या कपड्याचा तरूण मुंबईत आला. पोट भरण्यासाठी काम करत असताना, त्याला मुंबई काँग्रेसचे कार्यालय झाडायची नोकरी मिळाली. तिथे काम करत करत तो मोठा झाला आणि तोच थेट मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष झाला. त्याच्यावर धाड पडली तेंव्हा त्याच्याकडे ३५० कोटी रूपयाचे घबाड सापडले.

अवघ्या २० ते २५ वर्षातील हा बदल नेमके एका बाजुला लालूच दाखवून दुसऱ्या बाजुला लालुच देवून सत्ता हस्तगत करण्याचा प्रकार तर तिसऱ्या बाजुला स्वतः पोटभर खायचे दुःखीतांसमोर आश्रू ढाळायचे. पोपटापेक्षा जास्त पोपटपंची दाखवयाची, गोड गोड बोलून व खोटी आश्वासने देवून सत्ता काबीज करायची आणि त्यानंतर मतदाराकडे न फिरकणे असेही प्रकार होतात. काही बोलघेवडे लोक केवळ बोलण्याची लकब, सर्वसामान्यात मिसळणे आणि त्यांच्या परिवारातील कार्यक्रमाला हजेरी लावून सत्ता काबीज करतात. काही ठिकाणी भावनीक प्रश्न करून सत्ता हस्तगत करतात. काही ठिकाणी स्वतःचा विकास करायचा व त्याच जोरावर सत्ता मिळवायची आणि पुन्हा स्वतःचाय विकास करायचा असे काहीजणांनी सुत्रच ठरवले आहे. काहीजण तर वारसहक्काने सत्ता काबीज करून संपत्ती लुटत असतात. काहीजण सर्वसामान्यांची दुर्बलता लक्षात घेऊन त्यांना आपल्याकडील संस्थाचा आधार देवून कायमचे गुलाम बनवतात व वर्षानुवर्षेत्यांच्या मतावर आपली सत्तेची पोळी भाजतात. सत्ता मिळवण्याचे असे एक ना अनेक मार्ग आखून राजकारणात यशस्वी होणारे महाभाग सर्वत्र आहेत.

राजकारणात सत्ता मिळवणे सोपे असते पण ते टिकवणे सोपे नसते. लबाडी झबाडी करून मिळवलेली सत्ता चिरकाल नसते. मतदारापर्यंत तुमचे कार्य व तुमची तळमळ गेली असेलतरच मतदार कायम पाठीशी उभा राहतो. जिल्ह्यातील एकमेव नेता गणपतराव देशमुख असे होते की, कोणत्याही कुरघोड्यापेक्षा केवळ कर्तृत्व आणि मतदारावर असलेले प्रेम यातून त्यांना जनतेने ८० व्या वर्षीही सत्तास्थानवर बसवले. राज्यातील एकमेव नेता स्वकतृत्वावाने ११ वेळा आमदार बनले.

आपल्या तालुक्यात सत्तेत अनेकजण आले व गेले असेच चित्र राज्यात बहुतेक ठिकाणी पहावयास मिळते. अर्थातच त्याला अपवाद आहेत. आपल्या तालुक्याचे एक चांगले आहे, की येथे राजकारणातील दादागीरीला कोणतेही स्थान येथील मतदार देत नाही. अजुनही पैशावर भुलून मतात फारसा फरक झालेला दिसून येत नाही. राज्यात सत्ताकारणासाठी ज्या लबाड्या केल्या जातात, तशा लबाड्या करमाळा तालुक्यात फारशा प्रमाणात होत नाही; ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे.

अलीकडे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी कोणाचा बांधील राहिलेला नाही.
तालुक्यातील अनेक गावा-गावातील युवक सुशिक्षीत असून तालुक्यातील हजारो तरूण उच्च शिक्षीत झाले आहेत, एवढेच नव्हेतर शेकडो तरूण राज्यातील सन्मानाच्या पदावर सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या शब्दावर गावा-गावातील नागरिकांचा विश्वास आहे. त्यांनी ठरवलेतर ते आख्खे गावाचे व तालुक्याचे राजकरण सहज बदलू शकतात, अशी ताकदवान युवकांची फळी निर्माण झाली आहे. असे असलेतरी या राजकारणात अजुनही या तालुक्यातील युवक पाहिजे तसा पुढे येत नाही; ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

तालुक्याचा विकास झाला पाहिजे, राजकारण बदलले पाहिजे, भ्रष्ट राजकारणात सुधारणा झाल्या पाहिजे हे तरूणांना मान्य आहे पण हे बदलण्यासाठी राजकारणात स्वतः उतरण्याची तयारी तरूणात नाही ही वस्तुस्थिती आहे. खरंतर हे तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी व राजकीय पायवाट बदलण्यासाठी गावा-गावातील तरुणांनी सत्ताकारणात पुढे आले पाहिजे. एक- एक ग्रामपंचायत बदलली, आजही सत्तेवर अनेक तरूण दिसतात पण ते तरूण फक्त वयाने तरूणआहेत व विशिष्ट राजकीय दावणीला बांधलेले आहेत. बहुतांशी कुवत नसणाऱ्या व शब्द ओलंडणाऱ्यांना निवडणुकीत संधी मिळते. जनमाणसात काही करण्याची धमक आहे व तालुका बदलण्याचे स्वप्न हृदयी ज्यांनी बांधले आहे, त्यांनी मोठ्या सत्ताकारणापेक्षा गावपातळीपासून विकासाचे स्वप्न पाहून राजकारणात आले पाहिजे व खरे राजकारण कशाला म्हणतात ते दाखवून दिले पाहिजे. जनमतातील सरपंच ही संकल्पना प्रत्यक्षात अवतरली आहे.

सध्याच्या ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मांजरगाव, शेलगाव (वांगी), वरकटणे, वाशिंबे, सोगाव, पोंधवडी, कुंभारगाव, विहाळ, मोरवड, भिलारवाडी, दहिगाव,पोफळज, खातगाव, पोमलवाडी, कात्रज, जिंती, कामोणे, तरटगाव, खडकी, देलवडी, कोंढारचिंचोली अशी महत्वाची गावे आहेत. या गावातील निवडणुकीत पुर्वीचे राजकारण बदलून नव्या संकल्पना रूजवण्याची गरज आहे. आपल्या विकासाच्या दृष्टीने या
निवडणुकीच्या या माध्यमातून बदल करून दाखवावा !

✍️डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, जि. सोलापूर मो.९४२३३३७४८०

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!