महिलांचे पाऊल! - Saptahik Sandesh

महिलांचे पाऊल!

आज महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असताना दिसते. परभणी जिल्ह्यात तर अनेक प्रमुख प्रशासकीय पदांवर महिला विराजमान झाल्या आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,न्यायाधीश, महापौर, मुख्याधिकारी, तहसीलदार आदी विविध पदांवर एकाच वेळी महिला अधिकारी कार्यरत असणे हा एक इतिहासच म्हणावा लागेल. चूल आणि मूल या चक्रातून बाहेर पडून महिलांनी पाऊल बाहेर टाकले आहे पण ते जपूनच व योग्य दिशेने टाकले पाहिजे.

गेल्या आठवड्यात एका कामाच्या संदर्भात पती-पत्नी माझ्याकडे आले होते. पती काही बाजू मांडत असताना पत्नी मध्ये मध्ये बोलत होती. त्यावेळी पती तिला म्हणाला, ‘तु तरी सांग नाहीतर मला तरी सांगू दे..!’ त्यानंतर ती म्हणाली.. ‘तुम्हीच सांगा!’ पुन्हा तो पती हकीकत सांगत असताना पत्नी पुन्हा म्हणाली.. ‘अहो काहीतरी चुकींचं सांगू नका!’ त्यावर पती म्हणाला.. ‘अगं जी हकीकत आहे तीच मांडतोय मी!’ त्यावर पत्नी भडकली आणि पतीला म्हणाली.. ‘तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही बाहेर बसा. तुम्ही काही बोलायचे नाही!’ आणि तिने चक्क नवऱ्याला ऑफिसच्या बाहेर काढले. त्यावर तिनं तिची तक्रार मांडली. यावेळी तिच्या पतीची अवस्था अतिशय अवघड झाली होती. त्याचा एकतर अपमान झाला होता आणि दुसरी बाब तो बायकोला त्याबाबत काहीही उत्तर देऊ शकत नव्हता. या घटनेनंतर तो घरी निघून गेला असेल असे वाटले, पण तो घरी गेला नव्हता तो ऑफिसच्या दारात थांबला आणि बायको बाहेर आल्यावर तिला मोटरसायकलवर बसवून घरी गेला. अलीकडे पती लोकांचा अवमान कसा सुरू आहे, यातील हा एक प्रसंग..

गेल्या काही दिवसापूर्वीची एक बातमी देशभर गाजली होती. इंदौर येथील एका श्रीमंत परिवारातील ४५ वर्षाची महिला घरातून अचानक बेपत्ता झाली. पोलीसात तक्रार
दाखल झाली. तिचा शोध लागला तेव्हा कळाले, की ती तिच्यापेक्षा १३ वर्षानं लहान असणाऱ्या रिक्षाचालकासोबत पळून गेली. एवढेच नाहीतर पळून जाताना या महिलेने स्वत:सोबत लाखो रूपये किंमतीची दागिणे व ४७ लाख रूपये रोकड घेऊन ती फरार झाली होती. साधारणतः तीन आठवडे ही महिला फरारच होती. त्या कालावधीत तिने थोडे थिंडके नव्हेतर चक्क ४७ लाख रूपये उडविले. दागिणे मात्र जसेच्या तसे होते. ती पुन्हा तिच्या घरी आली. रिक्षाचालक मात्र फरार होता आहे.

पूर्वीची एक कथा सांगितली जाते ती म्हणजे… नवरा आंधळा आहे म्हणून स्वत:चे डोळे बंद करून त्याच्या शंभर पोरांना जन्म देणारी गांधारी कोणीकडे अन् आज डोळस नवऱ्यादेखत नवऱ्याचेच लाखो रुपये घेऊन तिसऱ्या बरोबर पळून जाणाऱ्या या महिलेची कथा कोणीकडे. पुर्वी महिलावर मोठा अन्याय केला जात होता. अगदी पुराणतील कथेमधूनही तसे स्पष्ट झाले आहे. शंकर हा भिल्लींवर लुब्ध झाल, विष्णूने वृंदेस, इंद्राने अहिल्येस, ब्रह्मदेवाने कुमारी मुलीस फसविले. म्हणजे पुराणकाळापासून महिलांवर अन्याय केला जात होता. एक-एक पुरुष चार-चार बायका करत असे, राजे राजवडे यांच्याकडे तर शेकडो राण्या होत्या, त्यात आवडती व नावडती राणी असे. नावडीतीला तर त्रास होत असेच पण तीच्या मुलांनासुध्दा भवितव्य नव्हते. गावच्या पाटलाकडे सुध्दा एक बायको वाड्यात तर एक गोठ्यावर असे. थोडक्यात पुर्वी महिला वस्तु किंवा उपभोग्य वस्तु समजली जात होती. काळाच्या ओघात हे चित्र बदलत चालले आहे. पण त्याचा अतिरेक होणे वाईट. सध्या सत्प्रवृत्तीचे लोक असे विकृत कृत्य करत नाहीत, पण विकृत वृत्तीचे लोक अनेक विकृत कृत्य करतात, याच्या वेगवेगळ्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो.

पुर्वी पुरुषाच्या बाबतीतही काही प्रमाणात असमन्वय होता व महिलांना मात्र त्रास होता, असे सुध्दा चित्र दिसते. नारदाची एक कथा आहे. नारद कृष्णाला म्हणतो.. ‘तुझ्याकडे १६ हजार १०८ स्त्रिया आहेत. त्यातील मला एक दे..!’ कृष्ण म्हणतो.. ‘जिथे मी नाही त्या स्त्री ला तु ने ।’ नारद महिलांच्या खोल्या पुंडाळत असतो आणि त्याला एके ठिकाणी कृष्ण दिसला नाही. तो खूष झाला आणि त्या खोलीत गेला. त्या स्त्रीला त्याने कवटाळले आणि शेजारी पाहतो तर कृष्ण तिथेच झोपलेला. ती स्त्री नारदाला ढकलून देते आणि नारदाची इज्जत काढते. नारदाला खूप वाईट वाटते आणि तो अपमानाच्या झटक्यात नदीत उडी मारतो. जेव्हा नदीतून यामध्ये बाहेर येतो तेव्हा तो नारद न राहता त्याची चक्क स्त्री नारदी झालेली असते. त्यानंतर तो स्त्री रूपी नारद एका घरात जाऊन पुरुषाच्या बरोबर रहातो. तेव्हा त्याला त्या घरातील पुरूषांकडून आहे ६० मुलं होतात. या मुलांचे संगोपन करता करता नारदी पूर्ण वैतागते आणि आत्महत्या करण्यासाठी जाते. त्यावेळी नारदीचा नारद बनतो. या कथा म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रीयांना प्रमाणापेक्षा जास्त मुल होती व त्यांना खुप त्रासाला सामोरे जावे लागत होते. याचे वास्तव चित्र दिसते आणि आज महिलांच्या अपत्याचा विचार करता चित्र बदलल्याच दिसते.

खरंतर अलिकडे अनेक महिलांनी स्वकर्तृत्वाने आपले संपूर्ण जीवनच बदलून टाकले आहे. मध्यंतरी परभणी जिल्ह्यातील एक महत्वाची बातमी वाचली. त्यामध्ये परभणीच्या जिल्हाधिकारी पदी आंचल गोयल, पोलीस अधिक्षक पदी रागसुधा आर, महापालिका आयुक्त पदी तृप्ती सांडभोर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडकर. याच जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून स्वाती दाभाडे, अरुणा संगेवार, मंजुषा मुथा तर याच जिल्ह्यात तहसीलदार म्हणून प्रतिभा गोरे, सुमन मोरे, पल्लवी केमकर व छाया पवार या महिला अधिकारी कार्यरत आहेत तर जिल्हा न्यायाधीश म्हणून श्रीमती यु.एम. नंदेश्वर या कार्यरत आहेत. एका जिल्ह्यात या महिला स्वकर्तृत्व दाखवून उभ्या तर राहिल्याच पण स्त्रीयांना खरा सन्मान त्यांनी मिळवून दिल्याचे समजते. एवढेच नाहीतर सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम त्या करत आहेत. सध्या या महिलांचा आदर्श युवतींनी घेण्याची गरज आहे.

एका बाजुला एक महिला उंच शिखरावर जात असताना दुसऱ्या बाजूला एक महिला आपला परिवारही उभा करू
शकत नाही. आपल्या घराची प्रगती करू शकत नाही. त्यामुळे या काळात महिलांची विशेषतः मुलींची जबाबदारी वाढली आहे. स्वकृर्तत्वाने मोठ्या व्हा, पण मोठे झाल्यानंतर किंवा महिलांचे समाजातील प्रमाण कमी झाले म्हणून त्याचा गैरफायदा घेणे अत्यंत चुकीचे आहे. अनेक तरुण मुली प्रपंच सोडून दोन-तीन लग्न करतात आणि तिथेही नीट रहात नाहीत. असे वागणे म्हणजे पुर्वी पुरुष जसे महिलावर अन्याय करत होते, तीच परंपरा जर आज काही महिलांनी सुरू केलीतर मग त्या पुरुषात व आजच्या आपल्या स्त्रियात काय फारक ..? घर सोडून पळूण जाणे ही बाबतर अत्यंत लाजीरवाणी आहे, पण अलीकडे दररोज मुली पळून जाताना दिसतात. महाराष्ट्रातून पळून गेलेल्या मुलींची आकडेवारी फार गंभीर आहे. जानेवारी मध्ये १६०० मुली, फेब्रुवारी मध्ये १८१० मुली, मार्च मध्ये २००० मुली पळून
गेल्याच्या नोंदी आहेत. हे चित्र भयावह आहे. यामध्ये अनेकांचे संसार मोडले तर अनेक घरातील पालकांना जगणे मुश्कील झाले आहे. यासर्व बाबीचा विचार करून मुली, महिलांनी परभणी जिल्ह्यातील तरुणींचा आदर्श घेऊन करीअर घडवले पाहिजे व योग्य दिशेने पाऊल टाकले पाहिजे.

✍️डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, मो.९४२३३३७४८०

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!