शिक्षण विभागाच्या विरोधात शिक्षक भारती संघटनेचे सोलापूर येथे आमरण उपोषण - Saptahik Sandesh

शिक्षण विभागाच्या विरोधात शिक्षक भारती संघटनेचे सोलापूर येथे आमरण उपोषण

केम(संजय जाधव) – 5 सप्टेंबर या शिक्षक दिना दिवशी शिक्षक भारती संघटना सोलापूरच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू झाले आहे. शिक्षण विभागातील भ्रष्टाचार व प्रलंबित प्रश्न या उपोषणातील मुख्य मागण्या आहेत. जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, करमाळा तालुका अध्यक्ष विजयकुमार गुंड, जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत पाटील या तिघांचे संघटनेच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहण्याचा निर्धार यावेळी विजयकुमार गुंड यांनी व्यक्त केला.

प्रलंबित मागण्यासाठी अन्यायग्रस्त ५ कर्मचाऱ्यांचे सहकुटुंब उपोषण सुरू आहे.जशा मागण्या पूर्ण होतील तसे आमरण उपोषणात सहभागी कर्मचारी आपापले उपोषण मागे घेतील असेही ते यावेळी म्हणाले.

शिक्षण अधिकारी महारूद्र नाळे यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु सर्व मागण्या पूर्ण करा तरच उपोषण मागे घेऊ असा संघटनेने निर्धार केला.

शिक्षण विभागातील कोणतेच काम टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय होत नाही. कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जाते. हेलपाटे मारावे लागतात. मानसिक त्रास दिला जातो. सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचा भस्मासुर बनला असून यामध्ये जिल्ह्यातील प्रामाणिकपणे काम करणारा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग भस्मसात होत आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री महारुद्र नाळे तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री मिरकले यांच्याशी संघटनेच्या चर्चा सुरू असून जोपर्यंत संघटनेची सर्व कामे पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!