श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी विवाहबंधनात -

श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी विवाहबंधनात

0

करमाळा(प्रतिनिधी) : करमाळा शहरात श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.रविवार, दिनांक १० मे २०२६ रोजी  करमाळा येथील चांदगुडे प्लॉट, बायपास रोड, करमाळा येथे विवाह सोहळा पार पडला. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष होते. या भव्य विवाह सोहळ्यात तब्बल २५ जोडपी विवाहबंधनात अडकली असून संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भारावून गेला होता.


सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्याने करमाळा तालुक्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेत वेगळे स्थान निर्माण केले आहे. सर्वधर्मीय समाजाला एकत्र आणत सामाजिक समतेचा संदेश देणारा हा सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.

श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे चौथे वर्ष होते, सन २०२३ मध्ये २१, सन २०२४ मध्ये ३१ आणि सन २०२५ मध्ये २७ असे एकूण ७९ विवाह श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने पार पडले आहेत. यंदाच्या २५ विवाहांमुळे या उपक्रमातून विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांची संख्या शंभराच्या पुढे पोहोचली आहे. याचे सर्व नियोजन हे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते, व प्रत्येक स्वयंसेवक हे प्रामाणिकपणे काम करतात,

या विवाह सोहळ्यात वधू-वरांना भांडीसेट, वधू-वरांचे कपडे, बूट-चप्पल, नवरदेवासाठी फेटा व शाल, नवरीसाठी साडी, मंडोळ्या, मनीमंगळसूत्र, जोडवी, बिचवे तसेच हार-फुले, गजरे आणि मेकअप किट यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय मिरवणूक, वऱ्हाडी मंडळींचे भोजन, मंडप, डेकोरेशन आणि मानाची शिदोरी अशी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, केवळ एक हजार रुपयांत वधू-वरांची नोंदणी करण्यात येते.


या भव्य विवाह सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी , बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत, आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार संयमामा शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहाजीभाऊ पवार, अविनाश महागावकर, चेतनसिंह केदार , रश्मी बागल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नववधू-वरांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे सांगितले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.



माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी विवाह सोहळ्यास उपस्थित राहत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. त्यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांना आपला कायम पाठिंबा राहील, असे सांगितले.

विवाह सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले. तालुक्यातील नागरिक, वऱ्हाडी मंडळी तसेच विविध समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गरजू कुटुंबांच्या आयुष्यात आनंद निर्माण करत समाजातील ऐक्य अधिक दृढ करणारा श्रीराम प्रतिष्ठानचा हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा करमाळा तालुक्यात सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!