गावकुसाबाहेरच सत्य (कथा)

श्रीपती आणि रखमाबाई आपल्या दोन मुलांना घेऊन शेतामध्ये काबाड कष्ट करत होती एके दिवशी अचानक श्रीपतीला बैलाने सिंग मारलं त्यात शिरपती गंभीर जखमी झाले परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे दवाखान्यात उपचार घेणे ऐवजी झाडपाल्याचे औषधाचे उपचार केले आठ-दहा दिवसात जखम चिघळली आणि एक महिन्याच्या आत श्रीपतीचे निधन झाले. रखमाबाईच्या डोळ्यापुढे दुःखाचा डोंगर कोसळला.
थोड्याशा जमिनीच्या तुकड्यावर शेती व मजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबाची वाताहत सुरू झाली एक-दोन वर्ष रखमाबाईंनी गड्याच बळ अंगात आणून काम केले परंतु त्या गावात संसाराचा गाडा चालवणं तिला कठीण झालं ऐन तारुण्यात झालेली विधवा, इतर लोकांच्या वाईट नजरा त्यामुळे ती या गावात अस्वस्थ झाली होती तेव्हा ती मावस भाऊ यांच्या गावी दोन मुलांना घेऊन गेली व मोल मजुरीचे काम करून संसाराचा गाडा चालवू लागली मुले दत्तू आणि सूर्यभान आता मोठी झाली होती दोन्ही मुलांचे मजुरी करण्याचं वय नसलं तरी परिस्थितीमुळे मजुरीला जाण्याची पाळी त्यांच्यावरही आली होती. रखमाबाईने सूर्यभानला मावस भावाच्या शेतीमध्ये काम करण्यासाठी सालगडी म्हणून ठेवले व थोरला दत्तू आणि ती मिळेल त्याच्या शेतावरती कामे करू लागली काही वर्षानंतर दत्तूचा विवाह शांताबाई बरोबर झाला तर सूर्यभान चा विवाह पारू बरोबर झाला पारू आणि सूर्यभान ज्यांच्याकडे साल धरले होते त्यांच्याच जनावराच्या गोठ्यात राहायला असत आणि रखमाबाई दत्तू आणि शांताबाई गावात राहत होते.. लग्न होऊन बरेच वर्षे झाली तरी सूर्यभानची पत्नी पारूची कुस उजवली नव्हती. परंतु दत्तूला मात्र मुले झाली होती त्यामुळे सूर्यभानची बायको पारू नेहमी नाराज दिसत असायची.. सूर्यभान हा धाकटा होता आईनं त्याच्या तब्येतीकडे लक्ष दिलेले असल्यामुळे त्याचा शरीर एकदम पिळदार मेहनत करून कमावलेले शरीर होतं कोणतेही ताकतीचे काम तो सहजपणे करत असे एखादा मारकोटा बैल वटणीवर आणण्याचे काम सूर्यभान अगदी काही दिवसातच करत असे ज्यांच्यात सालाने होता त्यांच्या मुलांच्या सोबतीने तो शेतात काबाड कष्ट करायचा पाहुण्यांच्याच शेतात साल गाडी असल्यामुळे त्याला सगळे दाजी म्हणत . अतिशय धाडसीपणा त्याच्या अंगात होता परंतु पारूला मूलबाळ होत नसल्यामुळे तोदेखील नाराजच असायचा
लग्नाला बरीच वर्षे झाली होती, पण त्यांच्या संसारात एकच कमी होती — आपत्य नव्हते. गावातल्या लोकांच्या बोलण्याने पारूच्या मनावर मोठा ताण यायचा. कुणी म्हणायचे देवाला नवस करा, कुणी म्हणायचे मंदिरात पूजा करा. सूर्यभान तिला नेहमी समजावायचा,
“देवावर विश्वास ठेव, कधीतरी आपल्यालाही सुख येईल.”
एके दिवशी गावात एक भोंदू बाबा आला. लोक त्याला चमत्कार करणारा समजत होते. पारु त्याच्याकडे गेली. तिने आपले दुःख सांगितले. तो म्हणाला,
“तुमच्या नशिबात अडथळा आहे. तो जर दूर करायचा असेल तर त्यासाठी तुला मी सांगेल ते कृत्य करावे लागेल तर तुमच्या घरात मूल होईल.” पारूच्या मनात भीती आणि आशा दोन्ही होत्या. सूर्यभानला ही गोष्ट पटत नव्हती, पण पारुला मुलासाठी काहीही करायचे होते.

सुगीचे दिवस सुरू होते. गावातील सर्व पुरुष मंडळी मोठी जनावरे घेऊन शेतातील कामांमध्ये व्यस्त असायची. घरातील जनावरांच्या गोठ्यात एक गाय, तिचे वासरू आणि पारू राहत होती. पारूला मूल व्हावे यासाठी भोंदू बुवाने सांगितलेल्या अटींवर विश्वास ठेवून तिने एक अत्यंत भयंकर निर्णय घेतला. एका रात्री तिने जनावरांचा गोठा पेटवून दिला. काही जनावरे दावे तोडून बाहेर पडली, परंतु एका निष्पाप खोंडाला स्वतःचा जीव वाचवता आला नाही. त्याच्या हंबरड्याने परिसर दणाणून गेला आणि त्या आगीत त्याचा दुर्दैवी अंत झाला.
काही दिवसांनी पारूला दिवस गेले. घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिच्या मनात आई होण्याचे स्वप्न फुलू लागले. परंतु तिचा नवरा सूर्यभान मात्र त्या घटनेला विसरू शकत नव्हता. त्या निष्पाप खोंडाचा हंबरडा, त्याची तडफड आणि त्याचा मृत्यू सतत त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहत असे. आपल्या मुलासाठी पत्नीने एका मुक्या जीवाचा बळी दिला, ही भावना त्याच्या मनाला सतत कुरतडत राहिली.
हळूहळू सूर्यभान मानसिकदृष्ट्या खचत गेला. शेतात किंवा गावात फिरताना त्याला सर्वत्र तोच खोंड दिसत असल्याचा भास होऊ लागला. तो त्याच्या मागे जाऊ लागे, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करी. एके दिवशी रात्री त्याला खोंड आल्याचा भास झाला खोडाच्या गळ्यातील घुंगर माळ वाजू लागली तसा तसा तो त्याच्या पाठी जाऊ लागला घनदाट जंगलामध्ये मेळवड्याच्या दिशेने तो त्याच्यापाठी रात्रभर फिरत होता दुसऱ्या दिवशी त्याचा शोध घेतला असता झुडपात अडकून बेशुद्ध पडलेला होता. गावकऱ्यांनी त्याला भूत बाधा झाली असे समजून विविध उपाय केले मांत्रिका कडे घेऊन गेले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अपराधीपणा, वेदना आणि त्या निष्पाप जीवाच्या आठवणींनी त्याचे मन पूर्णपणे ग्रासले होते. अखेरीस या मानसिक यातनांमधूनच त्याचा अंत झाला. त्याच्या मनात शेवटपर्यंत एकच जखम होती—आपल्या अपत्याच्या इच्छेसाठी एका मुक्या जीवाचा बळी देण्यात आला होता
सूर्यभानच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी पारूला एक गोंडस मुलगा झाला. मुलाच्या जन्माने तिच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले, पण सूर्यभानच्या आठवणी आणि गावातील लोकांच्या कुजबुजीमुळे तिला त्या गावात राहणे कठीण झाले. सासरच्या लोकांशी वाद झाल्यानंतर तिने आपल्या लहानग्या मुलाला घेऊन माहेरची वाट धरली. सूर्यभानची आईही विधवा झाल्याने काही काळाने गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली. अशा प्रकारे एकेकाळी गजबजलेले ते कुटुंब विखुरले गेले.

मुलाचे नाव लिंबाजी ठेवण्यात आले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत पारूने कष्ट करून त्याला मोठे केले. आई आणि मुलगा दोघेही रोजगार हमी योजनेच्या कामांवर जाऊन आपला उदरनिर्वाह करू लागले. बघता बघता लिंबाजी तरुण झाला. त्याचे लग्न झाले. त्याची पत्नी चंद्रा वयाने लहान होती, पण गरिबीमुळे तिलाही रोजगार हमीच्या कामावर जावे लागे. संसाराची स्वप्ने नुकतीच आकार घेत असतानाच नियतीने पुन्हा एकदा या कुटुंबावर घाला घातला.
एका ठिकाणी कालवा खोदण्याचे काम सुरू होते. खडक फोडण्यासाठी बोरिंगच्या छिद्रांमध्ये स्फोटके भरून स्फोट करण्यात आला होता. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर किती खडक फुटला आहे हे पाहण्यासाठी लिंबाजी पुढे गेला. मात्र एका छिद्रातील स्फोटक पूर्णपणे फुटले नव्हते. अचानक झालेल्या प्रचंड स्फोटाने लिंबाजी हवेत फेकला गेला आणि गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडला. त्याच दिवशी चंद्राला प्रथमच मासिक पाळी आली होती आणि संसाराची सुरुवात होण्याआधीच तिच्या कपाळचे कुंकू पुसले गेले. ती अल्पवयातच कुमारी विधवा झाली.
लिंबाजीच्या मृत्यूने पारू पूर्णपणे कोलमडून गेली. अनेक वर्षांपूर्वी स्वतःच्या हातून घडलेल्या त्या पापाची आठवण तिच्या मनाला सतत छळू लागली. ज्या खोंडाने गोठ्यात आगीत तडफडत प्राण सोडले होते, त्याचप्रमाणे आपल्या एकुलत्या एका मुलाचाही वेदनादायी मृत्यू झाला, अशी भावना तिच्या मनात घर करून बसली. नियतीने जणू तिच्या कर्माचा हिशेब तिच्यासमोर मांडला होता. आयुष्यभर मुलासाठी केलेल्या धडपडीचा शेवट दुःख, पश्चात्ताप आणि एकाकीपणात झाला. पारूच्या डोळ्यांसमोर मुलाचा चेहरा आणि त्या निष्पाप खोंडाचा हंबरडा शेवटपर्यंत घुमत राहिला. अशा प्रकारे एका अंधश्रद्धेने सुरू झालेली ही शोकांतिका तीन पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून संपली.
प
✍️ प्रा.धनंजय सत्यभामा विठ्ठल पन्हाळकर, 9423303768,नेरले तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर


