पाणीचोरी, वीजचोरीवर प्रशासनाचा वॉच- करमाळा तालुक्यात ११ भरारी पथके नियुक्त

0

करमाळा(प्रतिनिधी):करमाळा तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पाणीचोरी, अनधिकृत पाणी उपसा आणि वीजचोरी रोखण्यासाठी तहसील प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महसूल, पोलीस, महावितरण व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ११ भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून ही पथके तालुक्यात अचानक तपासण्या करणार आहेत.



तहसीलदार शिला ठोकडे यांनी यासंदर्भात १९ जून रोजी आदेश जारी केले असून नदी, कालवा, जलाशय बंधारे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर वाढत असलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत विविध भागांतून अनधिकृत पाणी उपसा, वीजचोरी करून मोटारी चालविणे आणि पाणीपुरवठा योजनांमध्ये अडथळे निर्माण केल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.

विविध मंडळांमध्ये तपासणीची जबाबदारी

नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांना करमाळा, जेऊर, जिंती, कोर्टी, पांगरे, उमरड, केम, केत्तूर, पोथरे, सालसे आणि अर्जुननगर या मंडळांमध्ये तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे. पथके अचानक भेटी देऊन पाणी उपसा, वीज वापर तसेच पाणीपुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

कायदेशीर कारवाईचा इशारा

अनधिकृत पाणी उपसा, वीजचोरी अथवा पाणीपुरवठा व्यवस्थेत अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम आणि वीज अधिनियम २००३ अंतर्गत गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपासणीदरम्यान आढळलेल्या प्रत्येक प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने सादर केला जाणार आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी आणि पाणीटंचाईच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार शिला ठोकडे यांनी नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!