माझ्या अंत्ययात्रेला विधवा महिलांनी खांदा द्यावा- विधवा महिलांना सन्मान देण्याबाबत प्रमोद झिंजाडे यांचे इच्छापत्र

0

करमाळा (दि.२१ जून) : विधवा प्रथा निर्मूलन मोहिमेला महाराष्ट्रात चालना देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी समाजातील विधवा महिलांबाबत असलेल्या अनिष्ट व भेदभावपूर्ण प्रथांना विरोध करत आपल्या मृत्यूनंतरच्या अंत्यसंस्कारांबाबत एक इच्छापत्र व संकल्पपत्र जाहीर केले आहे.

आपल्या अंतिम इच्छेमध्ये त्यांनी मृत्यूनंतर त्यांच्या अंत्ययात्रेत कुटुंबातील सदस्यांसह सर्व जाती-धर्मातील विधवा महिलांना तिरडीला खांदा देण्याचा अधिकार असावा, अशी भूमिका मांडली आहे. तसेच या निर्णयाला कुटुंबीय, नातेवाईक किंवा समाजातील कोणत्याही व्यक्तीने विरोध करू नये, असेही त्यांनी नमूद केले आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी अथवा त्यानंतर माझ्या कुटुंबातील किंवा समाजातील कोणत्याही विधवा महिलेसोबत कोणताही भेदभाव, कुजबुज किंवा अमानवी वर्तन होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर माझ्या मृत्यूनंतर दहावा,तेरावा,वर्षश्राद्ध अशा कार्यक्रमांवर खर्च करण्यापेक्षा विधवा प्रथा निर्मूलन व विधवांच्या विकासात्मक कामासाठी खर्च करावा अशी देखील इच्छा त्यांनी दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.



या संकल्प पत्राविषयी अधिक माहिती देताना श्री झिंजाडे म्हणाले की, पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना समाजात दुय्यम वागणूक देणे, त्यांना विविध धार्मिक व सामाजिक विधींमधून दूर ठेवणे किंवा त्यांच्याकडे तुच्छतेने पाहणे हा मानवी हक्कांचा भंग आहे. या सामाजिक कलंकाचे निर्मूलन करून विधवा महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे, हा त्यांच्या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन विधवा महिलांवरील अन्यायकारक परंपरा व सामाजिक कलंक दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

समाजाला आवाहन

आपला हा संकल्प कोणावरही लादण्याचा उद्देश नसून समाजप्रबोधनासाठी केलेला प्रयत्न असल्याचे झिंजाडे यांनी स्पष्ट केले आहे. इच्छुक नागरिकांनीही अशाच प्रकारचे संकल्पपत्र तयार करून आपल्या घरात दर्शनी भागात लावावे, जेणेकरून विधवा महिलांच्या सन्मानाचा संदेश समाजात अधिक व्यापकपणे पोहोचेल, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या अनोख्या सामाजिक उपक्रमाची परिसरात चर्चा सुरू असून विधवा महिलांच्या सन्मान व समानतेच्या प्रश्नावर नव्याने विचारमंथन होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रमोद झिंजाडे यांचे विधवा प्रथा निर्मूलनासाठीचे कार्य:

प्रमोद झिंजाडे हे करमाळा तालुक्यातील पोथरे येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष असून रोजगार हमी, विधवा महिलांचे हक्क, विधवा प्रथा निर्मूलन, बालमजुरी, बालविवाह आणि मानवाधिकार या विषयांवर ते कार्य करतात.

  • विधवा महिलांवर लादल्या जाणाऱ्या अन्यायकारक व भेदभावपूर्ण प्रथांविरोधात राज्यव्यापी जनजागृती मोहीम त्यांनी केली आहे.
  • विधवा महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
  • प्रमोद झिंजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी विधवांविरोधातील जुन्या रूढी-परंपरा बंद करण्यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने यासाठी प्रथम असा ठराव केला ज्याचे राज्यभर कौतुक झाले.
  •  शासनाकडे विधवा महिलांच्या सन्मान व संरक्षणासाठी धोरणात्मक आणि कायदेशीर उपाययोजनांची त्यांनी अनेकवेळा मागणी केली आहे.
  • त्यांच्या सामाजिक कार्याची दखल राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक माध्यमांनी घेतली असून, विधवा महिलांच्या सन्मानासाठी राबविलेल्या मोहिमेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!