सजग नागरिक व निर्भया पथकाच्या तत्परतेमुळे पोथऱ्यात रोखला बालविवाह

करमाळा(दि.२१):करमाळा तालुक्यातील पोथरे येथे होणारा बालविवाह पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून रोखला. डायल ११२ वर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे निर्भया पथकाने अवघ्या १५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचून कारवाई केली आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोथरे येथील आनंदी लॉन्स मंगल कार्यालयात एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती डायल ११२ वरून पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच करमाळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी बापूसाहेब कोकोटे यांनी निर्भया पथकाला कळविले. वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय वाहनासह पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पथकाने चौकशी केली असता तेथे अल्पवयीन मुलीचा साखरपुडा व विवाह सोहळ्याची तयारी सुरू असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी मुलगी, मुलगा व त्यांच्या पालकांची चौकशी केली. चौकशीत मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विवाह सोहळा तात्काळ स्थगित करण्यात आला.
पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत मार्गदर्शन केले. मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.
सदर अल्पवयीन मुलीला पुढील कार्यवाहीसाठी बाल कल्याण समिती, सोलापूर येथे हजर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सजग नागरिक व डायल ११२ ची तत्परता ठरली महत्त्वाची
बालविवाहाची माहिती मिळताच निर्भया पथकाने तातडीने हालचाल करून अवघ्या १५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचत विवाह रोखला. त्यामुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य सुरक्षित करण्यात यश आले. समाजातील नागरिकांनी दाखविलेल्या सजगतेमुळे ही कारवाई शक्य झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

