बालहक्क संरक्षणासाठी काम करणाऱ्या भुवन रिभु यांना ‘मेडल ऑफ ऑनर’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सोलापूर(दि.९): बाल हक्क संरक्षणासाठी काम करणाऱ्या जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन (जेआरसी) या संस्थेचे संस्थापक व प्रसिद्ध बाल हक्क वकील भुवन रिभू यांना वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनने (डब्ल्यूजेए) ‘मेडल ऑफ ऑनर’ने सन्मानित केले आहे. असा सन्मान मिळविणारे ते पहिले भारतीय अधिवक्ता ठरले आहेत. डोमिनिकन रिपब्लिकमध्ये ४ ते ६ मे दरम्यान झालेल्या वर्ल्ड लॉ काँग्रेसच्या समारंभात त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात ७० हून अधिक देशांतील १,५०० कायदेतज्ज्ञ आणि ३०० वक्ते सहभागी झाले होते.
जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन, जे जगातील सर्वात मोठे बाल हक्क संरक्षणासाठीचे कायदेशीर नेटवर्क आहे, हे देशातील ४१६ जिल्ह्यांमध्ये आपल्या भागीदार संस्थांद्वारे कार्यरत आहे. देशात बालविवाह आणि बाल तस्करी रोखण्याच्या प्रयत्नात रिभू यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
डब्ल्यूजेएने यापूर्वी विन्स्टन चर्चिल, नेल्सन मंडेला आणि रुथ बॅडर गिन्सबर्ग यांना सन्मानित केले आहे. या वर्षी भुवन रिभू यांना हा गौरव दोन दशकांहून अधिक काळ बाल हक्क रक्षणासाठी केलेल्या कायदेशीर लढ्यांमुळे प्राप्त झाला आहे. त्यांच्या जनहित याचिकांमुळे भारतातील बाल संरक्षण कायद्यात ऐतिहासिक बदल घडले.
करमाळा (जि. सोलापूर) येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे संचालक प्रमोद झिंजाडे याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हा सन्मान भुवनजींसाठीच नव्हे तर जिल्ह्यात आणि देशभर बाल हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण आहे. हा जागतिक सन्मान आमच्या प्रयत्नांना नवी ऊर्जा देतो तसेच २०३० पर्यंत सोलापूर बालविवाहमुक्त करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देतो. भुवन रिभू यांचे महाराष्ट्राशी आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्याशी खोल संबंध असून ते येथे महात्मा फुले समाज सेवा मंडळ या भागीदार संस्थेसोबत बाल हक्क संरक्षणाच्या कामात सक्रिय आहेत.
