करमाळ्यात उद्या रंगणार बैलगाडा शर्यतींचा थरार

करमाळा : करमाळा तालुक्यातील बैलगाडा शर्यतींच्या मैदानात उद्या मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. गुळसडी लगत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या फार्म हाऊस परिसरात २३ ऑगस्ट रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सुमारे ५०० बैलगाडे सहभागी होण्याची शक्यता आहे. दिवसभर चालणाऱ्या या स्पर्धेसाठी ८०० फूट लांबीचा ट्रॅक तयार करण्यात आला आहे.

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार संजयमामा शिंदे आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी सुमारे चार लाख रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी १ लाख ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ८५ हजार ५५५ रुपये, तृतीय क्रमांकासाठी ६५ हजार ५५५ रुपये आणि चौथ्या क्रमांकासाठी ४५ हजार ५५५ रुपये देण्यात येणार आहेत.

पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यास ३५ हजार ५५५ रुपये, सहाव्यास २५ हजार ५५५ रुपये, सातव्यास १५ हजार ५५५ रुपये, आठव्यास ११ हजार ५५५ रुपये तर नवव्या क्रमांकासाठी १० हजार ५५५ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मैदान आणि ट्रॅकची तयारी पूर्ण करण्यात आली असून बैलगाडा शर्यतींचा थरार पाहण्यासाठी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



