शासनाच्या जनहिताच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा – आमदार शिंदे
करमाळा (दि.१) – शासनाच्या लोककल्याणकारी योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हे नेहमीच महत्त्वाचे असते. या पार्श्वभूमीवर इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात येणारे मेळावे हे उल्लेखनीय आहेत. समाजातील सर्वात दुर्लक्षित घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळाला पाहिजे. शासनाच्या जनहिताच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे, असे मत करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले.
शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गासाठी राबविल्या जात असलेल्या शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी करमाळा तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आ. शिंदे हे होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शहरातील यश कल्याणी सेवा सदन सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्याप्रसंगी इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर कार्यालयाच्या सहाय्यक संचालिका मनीषा फुले, तहसीलदार शिल्पाताई ठोकडे, पंचायत समितीचे अधिकारी सारंगकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे – पाटील, भटके विमुक्त संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रामकृष्ण माने, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन तळेकर, जेष्ठ पत्रकार विवेक येवले, लिंबेवाडीचे सरपंच किरण फुंदे, युवा एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संग्राम माने, अंकुश जाधव, गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष नागेश काळे, प्रकाश माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, देवराव सुकळे, मानसिंग खंडागळे, अजित कणसे आदि उपस्थित होते.
सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन आ. शिंदे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्तविक करताना सहाय्यक संचालिका फुले यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच नागरिकांनी लाभ घेण्यासाठी त्यांच्या सोलापूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन केले.
यावेळी प्रा. करे -पाटील, रामकृष्ण माने, येवले आदिंनी मनोगते व्यक्त केली. तसेच एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा आणि प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा केम येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक नाटीका यांचे सादरीकरण केले. योजनांची माहिती देण्यासाठी परिसरात माहिती फलक लावण्यात आले होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळा, वस्तीगृह, राबविल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना, वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, वैयक्तिक घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना, इतर सामाजिक योजना, संस्थात्मक योजना, महामंडळे आदिंची माहिती असणारे माहिती पत्रक, पुस्तकांचे वाटप उपस्थितांना करण्यात आले.
याप्रसंगी कार्यालय प्रमुख शितल कंदलगावकर, शिवाजी नाईक, गणेश चव्हाण, भिवा वाघमोडे, यांच्यासह विविध गावचे नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव वाघमोडे यांनी केले. तर आभार किशोरकुमार शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता एकलव्य आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अशोककुमार सांगळे, केम प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार बिचितकर यांच्यासह आश्रमशाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.