एका दिवसात नोंद करणाऱ्या मंडल अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी.. - Saptahik Sandesh

एका दिवसात नोंद करणाऱ्या मंडल अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : प्रांत अधिकाऱ्याच्या दुरुस्ती आदेशानंतर अपीलाचा कालावधी ६० दिवसाचा असताना, तो नियम बाजूला ठेवून करमाळा मंडल अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात बेकायदेशीरपणे नोंद मंजूर केली आहे. संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भागवत शिंदे, इंद्रजित शिंदे, अनिल शिंदे, बंडू शिंदे यांनी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचेकडे केली आहे.

शिंदे परिवाराने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे, की.. मौजे खडकेवाडी येथील जमीन गट नं.६७ बाबत उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुडूवाडी यांचेकडे आर. टी. एस. अपील १३७ / २०२२ हे होते. त्याचा निर्णय दि. २७ / ९ / २०२३ ला झाला. त्यानंतर आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे मुदतीत अपीलही दाखल केले आहे. असे असताना सदर निर्णयावर तहसीलदार करमाळा यांनी उपविभागीय अधिकारी माढा विभाग यांचेकडे दि. २९/१/ २०२४ ला नोंदीबाबत अहवाल पाठविला.

त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आम्हाला नोटीस न काढता व कोणतीही चौकशी न करता सदर अपील क्र. १३७ / २२ वर तात्काळ दि. २/२/२०२४ रोजी दुरूस्ती आदेश दिला. सदरच्या आदेशाची प्रत आम्हांस पोस्टाने दि. ९/२/२०२४ रोजी मिळाली. त्यानंतर आम्ही गावकामगार तलाठी खडकेवाडी यांचेकडे गेलो असता त्यांनी सदर आदेशावर कालच (ता. ८ फ्रेब्रुवारी ) फेरफार नं.९४१ मंजूर झाला आहे. व त्याची नक्कलही दिली आहे.

संबंधितांनी नोंद न धरण्याबाबत पैशाची मागणी केली होती. ती मागणी आम्ही न पूर्ण केल्याने विरोधकांकडून पैसे घेऊन महसुल अधिनियम १९६६ कलम २५० प्रमाणे अपील कालावधी ६० दिवसाचा असतानाही एकाच दिवसात सदरची नोंद भ्रष्टाचारी पध्दतीने मंजूर केली आहे. त्यामुळे संबंधित तलाठी व सर्कल अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करावी व त्यांना निलंबित करावे अन्यथा आम्ही करमाळा तहसील समोर आमरण उपोषण करू; असा इशारा शिंदे परिवाराने या निवेदनात दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!