वृध्द महिलेस पाठीमागून मोटारसायकलची धडक - उपचारादरम्यान मृत्यू - Saptahik Sandesh

वृध्द महिलेस पाठीमागून मोटारसायकलची धडक – उपचारादरम्यान मृत्यू

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पायी चालत असलेल्या ७० वर्षाच्या महिलेस पाठीमागून मोटारसायकल स्वाराने धडक दिल्याने महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी गुळसडी (ता. करमाळा) येथे घडली आहे.

या प्रकरणी मोटारसायकल चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. यात आण्णा रामा कांबळे यांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझी आई कांताबाई रामा कांबळे (वय – ७०) ही १४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गुळसडी एसटी स्टॅन्ड जवळ असलेल्या किराणा दुकानातून किराणा घेऊन घरी येत असताना पाठीमागून राजू दास याने मोटारसायकलने जोराची धडक दिली.

या अपघातात माझी आई गंभीररित्या जखमी झाली. हे समजल्यानंतर आम्ही तिथे गेलो असता, राजू दास व अवि कांबळे यांनी तिला दवाखान्यात घेऊन गेले आहेत, असे समजले. त्यानंतर करमाळा येथून प्राथमिक उपचार करून आई कांताबाई हिच्यावर पुणे येथे उपचार सुरू केले, परंतू उपचार चालू असताना २१ सप्टेंबर रोजी रात्री तिचे निधन झाले. या प्रकरणी राजू दास यांनी आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्र.एमएच १४ एबी १५४१ ही भरधाव वेगाने व हयगयीने चालवून कांताबाई कांबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!