लंम्पी चर्म रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे - तहसीलदार समीर माने - Saptahik Sandesh

लंम्पी चर्म रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे – तहसीलदार समीर माने

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.15) :
राज्यांमध्ये जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे व धुळे या जिल्ह्यातील पशुधनामध्ये लंपी स्किन रोग प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ नुसार अधिसुचित केलेल्या रोगामध्ये लंपी स्किन रोग या रोगाचा अनुसुचित रोग म्हणुन समावेश केलेला आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन लंपी स्किन रोग निय॔त्रण समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार समीर माने यांनी तसेच गटविकास अधिकारी मनोज राऊत व पशुधन विकास अधिकारी डाॅ.प्रविण शिंदे यांनी केले आहे.

याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले की, तालुक्यामध्ये ९१५०० एवढी गाय व म्हैसवर्गीय जनावरे आहेत. लंपी हा विषाणुजन्य रोग गाई व म्हशीमध्ये आढळतो. या रोगात पशुंना ताप येणे, पुर्ण शरीरावर १०-१५ मी.मी. व्यासाच्या कडक गाठी येतात व तोंडात नाकात व डोळ्यात व्रण येतात.. सदरचा विषाणुजन्य रोगप्रादुर्भाव विविध प्रकारचे किटक, गोचिड, गोमाशा इ. मार्फत फैलाव होतो, त्यामुळे याचा फैलाव खुप फास्ट होतो.


सीमेवरील अहमदनगर व पुणे जिल्ह्यात या रोगाची साथ वाढत असल्याने करमाळा पशुसंवर्धन विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना सदर रोगाच्या अनुषंगाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत . पशुपालकांनी या रोगाला घाबरून न जाता या रोगाची लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या पशुवैधकीय संस्थेस कळवावे. बाधित जनावरे वेगळी बांधावीत. त्यांची चारा, पाणी व इतर अनुषंगिक साहित्य सुद्धा वेगळे ठेवावीत. प्रथम निरोगी जनावरे यांचा चारा पाणी करावे व नंतर बाधित जनावरे यांचेकडे जावे व त्यांचा चारा पाणी करुन घ्यावा. बाधित जनावरे यांचेवर पशुवैधकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सल्ल्यानुसार त्वरीत औषधोपचार करुन घ्यावेत. गोठे व लगतचा परिसर येथील डास, माशा, कीटक व गोचिड यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी Deltamethrin, Cypermethrin इ. औषधे पशुवैधकीय अधिकारी/कर्मचारी यांचे मार्गदर्शन नुसार वापरावीत.

सदर रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुपालकांनी घाबरून न जाता जागरुक होण्याचे व नमुद प्रतिबंधतात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन तहसिलदार समीर माने अध्यक्ष-लम्पी चर्मरोग संनियत्रण समिती, गट विकास अधिकारी श्री मनोज राउत सदस्य- लम्पी चर्मरोग संनियत्रण समिती व पशुधन विकास अधिकारी डॉ प्रविण शिंदे सदस्य सचिव- लम्पी चर्मरोग संनियत्रण समिती यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!