अखेर केम-कंदर रोडवरील खड्डे बुजविण्यात आले
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : पावसाळयात झालेल्या अतिवृष्टीमुळे केम-कंदर या रस्त्याची दुरावस्था झाली होती. रस्त्यात जागोजागी खड्डे तयार झाले होते. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नसल्याने मोटार सायकल घसरून लहान मोठे अपघात या ठिकाणी झालेले आहेत.
या रस्त्यासाठी वारंवार केम,वडशिवणे येथील नागरिक रोडवरील खड्डे बुजवावेत अशी मागणी करत होते. रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार संघटनेने देखील पाठपुरावा केला. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के-पाटील यांनी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज अभियंता यांच्याशी संपर्क साधून रस्ता त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी केली होती.
यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने याची दखल घेत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. या कामाचे केम,वडशिवणे,सातोली,कंदर येथील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले असून साईड पट्ट्या अजून भरायच्या बाकी आहेत. त्या देखील भराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.