गुराखी ते वाहन विक्री व्यवसाय – निरक्षर अशोक जाधव यांचा प्रवास..
जीवनामध्ये धाडस आणि जिद्द असेलतर खडकातूनही पाणी मिळते. तसेच जीवनात यश मिळते. याची प्रचिती पोथरे येथील शाळेचे तोंडही न पाहिलेल्या अशोक उत्तम जाधव यांच्या माध्यमातून येत आहे. गुराखी, मजूर, मुकादम, मिस्त्री, बॅन्ड चालक आणि आता वाहन विक्री व्यवसायात स्थिर झालेले हे व्यक्तीमत्व आहे.
अशोक जाधव यांची शाळेची सुरूवात मोठी गंमतीशीर झाली. ते पहिलीला शाळेत गेले आणि त्याची चड्डी फाटली. यामुळे मुले हसली आणि अशोकने अर्ध्या दिवसातच शाळेला सोडचिठ्ठी दिली. घरची स्थिती नाजूक असल्यामुळे आई-वडीलांनी चक्क गुराकडे ठेवले. तत्कालीन कै.शिवराम आढाव यांच्या गुराकडे अशोकने एक वर्षभर काम केले. त्यावेळी ३० रू. महिना पडत होता.
पुढे माजी सरपंच कै. नारायण मास्तर शिंदे यांच्या शेतात २० रू. रोजाने काम सुरू केले. ते काम चालू असतानाच म. फुले समाजसेवा मंडळाच्यावतीने रात्रशाळा सुरू झाली आणि त्या शाळेत अशोक जाधव हे लिहायला वाचायला शिकले. यातूनच त्यांनी म. फुले समाजसेवा मंडळाचे प्रमुख प्रमोद झिंजाडे यांचे मार्गदर्शनाखाली दुष्काळी कामावर बंधारे बांधणे, स्ट्रेचिंग करणे, नाला बांधणे अशी कामे सुरू केली. त्यावेळी मजुर म्हणून व नंतर मुकादम म्हणून काम केले. ते काम चांगल्या पध्दतीने केले. दुष्काळी कामे संपल्यानंतर वडील उत्तमराव जाधव हे उत्कृष्ट पध्दतीने बॅन्डमध्ये कलाट वाजवत होते. दुसऱ्याच्या येथे कशासाठी काम करायचे ? असा प्रश्न अशोक जाधव यांनी वडीलांना विचारला व आपले छोटे बंधू विजय याच्या नावाने विजय ब्रास बॅन्ड सुरू केले.
सर्व साहित्य आणून वेगवेगळ्या लग्नाचे व सत्कार समारंभाचे कार्यक्रमात ते वाजवत असत. परंतू बॅन्डचे काम हे सिझनेबल असे. त्यामुळे दुसरा व्यवसाय केला पाहिजे हे अशोक जाधव यांनी मनाशी ठरवले होते. दरम्यान त्यांचे उंडा पिंपळगाव येथील धोंडिराम खवले यांची कन्या माया हिच्याबरोबर विवाह झाला. त्यांची सासरवाडी उंडा पिंपळगाव असलीतरी हे सर्वजण सातारा येथे कामासाठी गेले होते. दरम्यान अशोक जाधव यांनाही काम नसल्याने ते सातारा येथे गेले आणि पाहूण्यांबरोबर बांधकाम करू लागले आणि त्यातच ते मिस्त्री झाले.
मिस्त्री म्हणून त्यांनी अनेक कामे केली. सिमेंट बंधारे, भुमीगत बंधारे, घराची बांधकामे इ. कामे केली. ही कामे करताना अनेकांशी संपर्क आले आणि त्यातूनच त्यांना वाहन खरेदी अथवा विक्रीची समस्या जाणवली व स्वत:च ते काम त्यांनी सुरू केले. पाहता पाहता या व्यवसायला दीड तप (१८ वर्षे) पूर्ण झाले. सध्या त्यांचे करमाळा येथे बायपासवर कमलाई मोटर्स नावाचे कार्यालय आहे. ग्राहकांच्या गाड्या कमिशन बेसिसवर विकता विकता सध्या ते स्वत:च जुन्या पण चांगल्या वेगवेगळ्या कंपनीच्या चारचाकी गाड्या खरेदी करतात आणि विक्री करतात. विशेष म्हणजे या व्यवसायात त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळाले आहे.
करमाळा तालुक्यातील लोक अतिशय समजुतदार व सहकार्य करणारे आहेत. माझ्या सारख्या निरक्षर माणसाला या व्यवसायात त्यामुळेच यश मिळाले आहे. आज माझी प्रगती पाहता मी अतिशय आनंदी आहे. माझे आई-वडील, भाऊ व पत्नी माया यांचे पाठबळ मिळाले. मला तीन मुले असून मोठा मुलगा सागर हा माझ्या व्यवसायात आहे. गणेश एस. वाय. बी. ए. ला तर सौरभ हा मल्ल म्हणून पुणे येथे शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्याने झेप घेतली होती. करमाळा तालुक्यात मी असलोतरी माढा, परांडा, कर्जत, जामखेड या तालुक्यातील ग्राहक जोडले आहेत. मध्यंतरी मी दोन महिन्यात ४७ जे.सी.बी. विक्री केली आहे. तर पोकलॅन्ड, जीप, कार, टेम्पो अशी आत्तापर्यंत शेकडो वाहने विकली असून कोणाचीही फसगत होणार नाही, अशी काळजी घेत असल्याने या व्यवसायात मी टिकून आहे.
– अशोक जाधव (प्रोप्रा : कमलाई मोटर्स) ९६२३४१५२४४