गुळसडी येथे भव्य बैलगाडा शर्यतीत लखन व चिक्या ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी - Saptahik Sandesh

गुळसडी येथे भव्य बैलगाडा शर्यतीत लखन व चिक्या ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२४: माजी उपमुख्यमंत्री
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने गुळसडी येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या फार्म हाऊसमध्ये काल रविवारी (दि. २३ ऑगस्ट) झालेल्या या थरारक स्पर्धेत तब्बल ३७८ बैलगाड्यांनी सहभाग नोंदविला. दिवसभर शर्यतीच्या मैदानावर बैलांच्या टापांचा दणदणाट आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त जल्लोषाने परिसर दुमदुमून गेला.

या  बैलगाडा शर्यतीचे उदघाटन माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आबा गुळवे, प्रशांत पाटील,तसेच अण्णासाहेब ढाणे, योगेश दळवी, पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने, सदस्य चंद्रकांत काका सरडे, भरत अवताडे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

विजेत्यांवर लाखोंच्या बक्षिसांची बरसात!
स्पर्धेसाठी सुमारे चार लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. अंतिम फेरीत बारामतीचे योगेश भगत व सागर भाऊ थोरात यांचा ‘हिंदकेसरी लखन’, तसेच बदलापूरचे कुमार कार्तिक शेठ व मुरूम येथील राजे फार्म संभाजी राजे भोसले यांचा ‘चिक्या’ यांनी दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना १ लाख ५५५ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
द्वितीय क्रमांक हेमंत आबा घोलप पाटील व मोहम्मद अली रिस्क ग्रुप, कराड यांच्या ‘लाडका राहुल्या’ आणि सार्थक विजय पाटील यांच्या ‘सर्जा’ या बैलजोडीने मिळविला. त्यांना ८५ हजार ५५५ रुपये बक्षीस मिळाले.
तृतीय क्रमांक शिवन्या लक्ष्मण ढेरे, देवळाली व मानसी योगेश भंडारे यांच्या ‘बलमा’ तसेच मोईन शेख यांच्या ‘मन्या भाई’ यांनी पटकावला. त्यांना ६५ हजार ५५५ रुपये पारितोषिक देण्यात आले.
याशिवाय चौथ्या क्रमांकासाठी ४५ हजार ५५५ रुपये, पाचव्या क्रमांकासाठी ३५ हजार ५५५ रुपये, सहाव्या क्रमांकासाठी २५ हजार ५५५ रुपये, सातव्या क्रमांकासाठी १५ हजार ५५५ रुपये, आठव्या क्रमांकासाठी ११ हजार ५५५ रुपये आणि नवव्या क्रमांकासाठी १० हजार ५५५ रुपयांची बक्षिसे देण्यात आली. तसेच उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीतील विजेत्यांसाठीही स्वतंत्र बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती.

विजेत्या बैलगाडा मालकांना निमगाव (के)चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी बाबाराजे जगताप, मानसिंग खंडागळे, सुजित बागल, गणेश सरडे, सोमनाथ रोकडे, नानासाहेब लोकरे, उमेश इंगळे, तानाजी झोळ, रवींद्र वळेकर, गोरख गुळवे, विनय ननवरे, आशिष गायकवाड, राजाभाऊ धांडे, विवेक येवले, नानासाहेब निळ, हनुमंत मांढरे, अमर भांगे, राजकुमार देशमुख, राजेंद्र पवार, तुषार शिंदे, श्रीकांत ढेरे, सुरज ढेरे, योगेश भंडारे, शहाजी झिंजाडे, मयूर पाटील, बालाजी पाटील, सतीश बागल, अभिषेक आव्हाड, अश्फाक जमादार, प्रताप शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
बैलगाडा शर्यतीचा थरार, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विजेत्यांवर झालेली बक्षिसांची बरसात यामुळे गुळसडी येथील हा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.

error: Content is protected !!