‘राजेरावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी’च्या 15 दिवसात 200 सभासदांचा टप्पा पार

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : केंद्रशासनाच्या धोरणानुसार तसेच नाबार्ड ,महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांच्या सूचनेनुसार व वॉटर या संस्थेच्या सहकार्याने राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड या कंपनीची स्थापना केलेली असून या कंपनीवरती विश्वास ठेवून 200 हून अधिक सभासदांनी सभासद नोंदणी केली असल्याची माहिती राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष डॉ.विकास वीर यांनी दिली.
करमाळा तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील तरुणांनी एकत्र येऊन राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड करमाळा या कंपनीची नोंदणी केलेली आहे.
भारत सरकारच्या 10000 शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याच्या प्रकल्पांतर्गत करमाळा तालुक्यातील स्थापन झालेली राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही एकमेव कंपनी आहे. या कंपनीचे सभासद शुल्क 5100 रुपये असून सप्टेंबर 2022 मध्ये प्रत्यक्षात सभासद नोंदणीला प्रारंभ केला होता.
या कंपनी विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो.उत्पादक ते ग्राहक असा थेट व्यवहार झाल्यास शेतीमालाला अधिकाधिक भाव निश्चितच मिळू शकतो. कंपनी चा मूळ उद्देश शेतकऱ्यांचे हित जोपासणे हाच आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून अधिकाधिक उत्पादन घेणे, देश-विदेशातील बाजारपेठेला आवश्यक असलेला गुणवत्तापूर्ण माल तयार करणे, पिकांचे प्रोटोकॉल पाळणे ,डाग विरहित उत्पादन घेणे, रासायनिक खतांचा अतिरिक वापर टाळून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवणे, मध्यस्तांची साखळी कमी करून शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव मिळवून देणे हा कंपनी स्थापन करण्यापाठीमागचा मूळ उद्देश आहे.
कंपनीच्या माध्यमातून गुणवत्ता पूर्ण रोपे , निविष्ठा माफक दरात उपलब्ध करून देणे, तसेच माती, पाणी परीक्षण करून रासायनिक खतांवरील अतिरिक्त खर्च कमी करणे, कृषी तज्ञांच्या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे, पॅक हाऊस, वेअर हाऊस, मार्केटिंग, ब्रँडिंग ची यंत्रणा उभी करणे हे कंपनीचे भविष्यातील धोरण असेल.
नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, सर्कल भाऊसाहेब, पोलीस उप निरीक्षक, शेतकरी, उद्योजक, शिक्षक, शासकीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, इंजिनियर यांनी ज्या विश्वासाने कंपनीचे शेअर्स खरेदी केले त्यांच्या विश्वासाला बांधील राहून राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचे सर्व संचालक भविष्यात काम करतील.
सभासदांच्या या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सर्व संचालक मंडळी करतील. ज्या नागरिकांना शेअर्स खरेदी करायचे आहेत त्यांनी संचालक मंडळाशी तात्काळ संपर्क करावा मर्यादित शेअर्स उपलब्ध आहेत असे आवाहन संचालक अलका नलवडे, रुक्मिणी माने, सुपर्णा बागल, अरुण चौगुले, संतोष पवार, बिभीषण मस्कर, जीवन होगले, अजित काटूळे, भारत अडसूळ यांनी केले आहे.
