दुष्काळात तेरावा महिना - वादळी वाऱ्यामुळे फळबागा भुईसपाट - Saptahik Sandesh

दुष्काळात तेरावा महिना – वादळी वाऱ्यामुळे फळबागा भुईसपाट

केम परिसरात वादळी वाऱ्यामुळे झालेले केळीच्या बागांचे झालेले नुकसान

केम (संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील केम येथे मंगळवारी १४ मे रोजी. दुपारी ४ वा झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसाने केळीच्या बागा भुई सपाट झाल्या. यामध्ये अंदाजे २० हेक्टर क्षेत्रावरिल बागा बाधित होऊन अंदाजे ३० लाखापर्यत शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सध्या दुष्काळी परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे या बागा सांभाळल्या होत्या. पण अचानक आलेल्या वादळाने या बागा होत्याच्या नव्हत्या झाल्या. अगोदरच शेतकऱ्यांच्या कोणताही पिकाला भाव मिळत नाही. या बागेसाठी लाखो रूपये खर्च येतो. शेतकऱ्यानी पिक विमा भरला आहे पण अजुन त्याना पैसे मिळाले नाहित. आता हे नवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभारले आहे. शेतकऱ्याना आधार म्हणून शासनाने त्वरीत पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

केम परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये शाम तळेकर १.५ एकर, विकास तळेकर १ एकर, महेश तळेकर ८ एकर, अच्युत काका पाटिल ४ एकर, दत्तात्रय बिचितकर ३ एकर, विजय अवचर १.५ एकर, भैरू बिचितकर २ एकर, सर्जेराव बिचितकर ४ एकर, राहुल दिलीप तळेकर १.५ एकर, किरण तळेकर यांची १००० झाडे खाली पडली.

या बाबत गावकामगार तलाठी यांना विचारणा केली असता आम्हाला पंचनामे करण्याचा आदेश अद्याप मिळाला नाही तरी पण कृषी अधिकारी यांच्याही चर्चा करून बाधित क्षेत्राची पाहणी करून अहवाल तयार करून ठेवतो. वरून आदेश आल्यावर हा अहवाल शासनाकडे पाठवता येईल असे त्यांनी सांगितले.

मिरगव्हाण येथे देखील वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना फटका  – मिरगव्हाण परिसरातील शेतकऱ्यांना देखील वादळी वाऱ्याचा फटका सहन करावा लागला आहे. येथील शेतकरी भास्कर विश्वनाथ लावंड यांची दि.१४ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्याने काढणीसाठी आलेली केळीची जवळपास १.५ एकर बाग जमीनदोस्त झाली. लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

मिरगव्हाण येथील शेतकरी भास्कर लावंड यांची वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झालेली केळीची बाग

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!