श्रीमती गंगुबाई संभाजी शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे करमाळ्यात झाले उद्घाटन - Saptahik Sandesh

श्रीमती गंगुबाई संभाजी शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे करमाळ्यात झाले उद्घाटन

करमाळा (दि.२०): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या नावाने करमाळ्यात शिवजयंतीच्या निमित्ताने १९ फेब्रुवारीला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. 

या हॉस्पिटलच्या उदघाटन कार्यक्रमास तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, विद्या विकास प्रतिष्ठानचे सचिव विलासराव घुमरे, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड कमलाकर वीर, कॉन्ट्रॅक्टर अनिल पाटील, व्यापारी विनोद गुगळे आदी मान्यवर उपस्थित होते

उपमुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी मंगेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, हॉस्पिटलचे सचिव दीपक पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना जास्तीत जास्त मोफत सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशी माहिती सचिव दीपक पाटणे यांनी दिली आहे

या ठिकाणीच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मोफत डायलिसिस सेंटर सुरू असून
मनोहरपंत चिवटे संचलित श्री कमला भवानी ब्लड बँक सुरू आहे. आता नवीन हॉस्पिटल देखील सुरू झाल्याने एकाच छताखाली विविध आरोग्य सेवांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.

यावेळी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर डॉ.ओंकार उघडे माहिती देताना म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना अत्यंत अल्प दरात चांगली दर्जेदार रुग्णसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून करमाळा तालुक्यातील कोणताही रुग्ण उपचाराविना  किंवा मार्गदर्शनाविना परत जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. ‘रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद’ वाक्य घेऊन काम करू. सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करण्यासाठी मुंबई ठाणे पुणे येथून नामांकित डॉक्टर दर आठवड्याला करमाळ्याला येणार आहेत. अत्यंत माफक दरात उपचार व ऑपरेशन करण्याची सोय या माध्यमातून करमाळा वासियांना होणार आहे. शंभर रुपयांमध्ये रुग्णांची तपासणी करून व इंजेक्शन दिले जाणार असून पुढील सात दिवस मोफत रेगुलर तपासणी केली जाणार आहे. हृदयविकार कॅन्सर दमा त्वचारोग लिव्हर किडनी गुडगा मणका ऑपरेशन सर्पदंश उपचार आदीची देखील  सोय करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले..

सध्या आरोग्य सेवा व त्यासाठी वाढता खर्च हा सर्वसामान्य गोर गरीब जनतेसाठी गंभीर विषय बनलेला असून या  हॉस्पिटल मधून रुग्णांना अल्प दरात उपचार मिळत असल्यामुळे गोरगरीब जनतेला हे हॉस्पिटल आधार ठरणार आहे असे मत करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.

डॉ. ओंकार उघडे हे एमबीबीएस पदवी घेतलेले डॉक्टर असून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, रुबी हॉल, केईएम हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल अशा नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांनी आपली सेवा दिलेली आहे.

रुग्णाकडे उत्पन्नाचे साधन म्हणून न बघता कमीत कमी खर्चात त्याला उपचार देण्याची भूमिका या हॉस्पिटलमधून घेतली जाणार आहे.

महेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!