जगदीश ओहोळ यांना ‘समाजमित्र प्रबोधनकार’ पुरस्कार प्रदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे व्याख्याते जगदीश ओहोळ यांना मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दौंड तालुक्यातील यवत येथे आयोजित महिला महामेळाव्यात सामाजिक वैचारिक जनजागृती व योगदानाबद्दल ‘समाजमित्र प्रबोधनकार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम २० नोव्हेंबर रोजी यवत येथे संपन्न झाला.
व्याख्याते जगदीश ओहोळ हे सबंध महाराष्ट्रभर शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, जिजाऊ, सावित्रीमाई, अहिल्याबाई होळकर, रमाई, फातिमाबीबी आदी महान कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रावर मागील बारा वर्षांपासून समाज प्रबोधनाचे कार्य निर्भिडपणे राज्यभर गावखेड्यात जाऊन करतात.
जगदीश ओहोळ आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून समाजासमाजात एकात्मता व एकोपा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करतात. महामानवांना अभिप्रेत समाज निर्मितीसाठी कोणतीही तमा न बाळगता इतिहास सांगतात, त्यांच्या या कार्यामुळे ते खऱ्या अर्थाने सर्व समाजांमध्ये मैत्रीपूर्ण स्नेहबंध निर्माण करून नव्या पिढीला खरा इतिहास सांगत आहेत. म्हणून त्यांना जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ.माधुरीताई भदाणे ताई यांच्या हस्ते ‘समाजमित्र प्रबोधनकार’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विचारपीठावर जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य महासचिव स्नेहाताई खेडेकर, महानंदा दूध संघाच्या अध्यक्षा वैशाली ताई नागवडे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सारिका ताई भुजबळ, पंचायत समिती सदस्य निशाताई शेंडगे, शोभाताई जगताप, जिल्हाध्यक्ष सूनिताताई शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

