जगताप गट तालुका राजकारणात आमदार संजयमामा शिंदे सोबत तर वरिष्ठ पातळीवर भाजपा सोबतच काम करणार : माजी आमदार जयवंतराव जगताप.. - Saptahik Sandesh

जगताप गट तालुका राजकारणात आमदार संजयमामा शिंदे सोबत तर वरिष्ठ पातळीवर भाजपा सोबतच काम करणार : माजी आमदार जयवंतराव जगताप..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : करमाळा तालुक्यामध्ये जगताप गटाने स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर आजपर्यंत खूप चांगल्या क्षमतेने काम केले आहे. माजी आमदार स्वातंत्र्यसैनिक कै. नामदेवरावजी जगताप यांनी या तालुक्याच्या विकासासाठी संपूर्ण हयात वेचली. त्यांच्यानंतर जनतेच्या पाठींब्याने मी आजपर्यंत तालुक्याच्या विकासासाठी काम करत आहे. राजकारणाचा विचार करता तालुका राजकारणात जगताप गट हा आमदार संजयमामा शिंदे यांच्या सोबत कायम राहणार आहे. परंतू वरीष्ठ पातळीवर जगताप गट हा भाजपा पक्षाचेच काम करणार आहे; असे जगताप गटाचे नेते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले.

माजी आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने ते सा. कमलाभवानी संदेशशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की आम्ही स्वातंत्र्यसैनिकाचे वारसदार असून आम्हाला कशाचीही अपेक्षा नाही. राजकारणात आजपर्यंत आपण भ्रष्टाचार मुक्त कारभार केला असून, मी कधीही खोटे बोलत नाही व स्पष्ट वक्ता म्हणून वाटचाल करतो. माझ्या वाटचालीत मी कोणाही विरोधकाचे नुकसान केले नाही.

त्यामुळे इतरांचे नुकसान करण्याचा प्रश्नच नाही. तालुक्यात विकासकामासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आजही आ.संजयमामा यांचे सोबत तालुक्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवत आहे. विकास हा कधीच परिपूर्ण होत नाही. त्यामुळे काही ना काही समस्या राहतात. तरीही आहे या समस्या सोडविण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी आमदार संजय मामा शिंदे यांना भाजपालाच पाठिंबा द्यावा अशी सुचवले होते हे त्यांनी मान्य ही केले होते, परंतु भाजपाला बहुमत न मिळाल्याने त्यांनी बाहेरून राष्ट्रवादीला पाठिंबा दिला, परंतु पक्षात गेले नाही, एवढेच नाही तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीला आम्ही भाजपाचेच काम केले होते,  सध्या देशात भाजपा सरकार आहे, म्हणूनच शांतता असून कुठेही दंगली, गोंधळ आढळत नाही भाजपाचे काम चांगले असल्याने आम्ही वरिष्ठ पातळीवर भाजपासोबतच काम करणार आहोत असेही श्री.जगताप यांनी म्हटले आहे

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा सर्व निवडणुका आमदार संजय मामा शिंदे व जगताप गट एकत्र लढवणार आहे, करमाळा तालुक्यातील जनतेला शांतता सुव्यवस्था व आरोग्य देण्याबाबत प्रयत्न करत आहोत, याबरोबरच औद्योगीकरण, शेतीचे प्रश्न हे सोडवण्यासाठी नियोजनबद्ध काम करत आहोत, तालुक्यातील जनतेने विकास काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहावे, सध्या राजकारणात पैसा महत्वाचा ठरत असून मतदार पैशाच्या पाठीमागे जात असल्याने चुकीचे लोक सत्तेत येत आहेत, त्यामुळे मी माझ्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्यातील जनतेला विनंती करतो की, निवडणुकीत मतदानाला सर्व मतदारांनी झाडून यावे, कोणत्याही अपेक्षेला बळी न पडता योग्य निवड करून मतदान करावे.. की ज्यामुळे भविष्यात चांगला उमेदवार निवडून येईल व जनतेची सेवा करेल 

– माजी आमदार जयवंतराव जगताप

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!