केमचे रहीवासी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर

0
पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव

करमाळा/संदेश प्रतीनिधी
करमाळा ता.१४ : केम येथील रहिवासी आणि सध्या कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले जालिंदर अंकुश जाधव यांना त्यांच्या उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण व निष्कलंक सेवेसाठी ‘उत्कृष्ट सेवा पदक – २०२६’ जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे केमसह संपूर्ण करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

श्री. जाधव हे २६ जुलै २००६ रोजी पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून सेवेत रुजू झाले. आपल्या  उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०१६ यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आणि ५ जानेवारी २०१८ रोजी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी मिरज वाहतूक शाखा, कडेगाव पोलीस ठाणे, विटा पोलीस ठाणे, करवीर पोलीस ठाणे यांसह विविध ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावली आहे. आजपर्यंत त्यांनी १९ वर्षे १० महिन्यांची गुणवत्तापूर्ण व निष्कलंक सेवा बजावली असून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तब्बल १७१ बक्षिसे व प्रशंसापत्रे प्राप्त झाली आहेत. कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असताना श्री. जाधव यांनी १७ खूनाच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून ३३ आरोपींना अटक केली आहे. शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गंभीर दरोड्याच्या गुन्ह्यात त्यांनी पाच आरोपींना अटक करून ₹७ लाख ९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अमली पदार्थविरोधी कारवाईतही त्यांचे योगदान उल्लेखनीय असून NDPS कायद्यांतर्गत विविध कारवाया करून त्यांनी मोठ्या प्रमाणात गांजा, कोकेन, एमडी यांसारखे अमली पदार्थ जप्त केले आहेत. दरोडा व खंडणीच्या गुन्ह्यांच्या तपासातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून विविध प्रकरणांत आरोपींना अटक करून ₹१ कोटी ७५ लाखांपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच एका खंडणीच्या प्रकरणात आरोपींना अटक करून ₹२५ लाखांची रोकड जप्त केली. घरफोडी, चोरी व मोटारसायकल चोरीच्या विविध गुन्ह्यांचा तपास करताना त्यांनी मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विविध गुन्ह्यांमध्ये त्यांनी ₹१० लाख १२ हजार ५००, ₹८६ लाख २६ हजार १००, ₹१७ लाख ४६ हजार १८०, ₹३६ लाख ७५ हजार ४१६, ₹३२ लाख ४४ हजार ५१९, ₹५३ लाख ४२ हजार ३३४, ₹३५ लाख ६० हजार तसेच ₹३१ लाख ९ हजार ८९ अशा मोठ्या रकमेचा मुद्देमाल जप्त करून अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. याशिवाय त्यांनी ४९ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. बेकायदेशीर शस्त्रांच्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करून पाच देशी बनावटीची पिस्तुले जप्त केली आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक व विक्रीविरुद्ध कारवाई करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित माल जप्त केला आहे. श्री. जाधव यांच्या उल्लेखनीय कामगिरीची यापूर्वीही विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे.  त्यांना ‘लिलावर्ध गुणवान कर्मयोगी पुरस्कार’ , विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण पुरस्कार – २०२४’ तसेच पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह व प्रशंसापत्र – २०२५ देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांच्या दीर्घकाळच्या कर्तव्यनिष्ठ, आणि उल्लेखनीय सेवेची दखल घेत ‘उत्कृष्ट सेवा पदक – २०२६’ जाहीर करण्यात आले आहे. जालिंदर जाधव यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याची बातमी समजताच केम ग्रामस्थांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रांतील     मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!