जातेगाव ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू करू - केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन - Saptahik Sandesh

जातेगाव ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू करू – केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जातेगाव ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्ग ५१६ मधील करमाळा तालुक्यातून जाणाऱ्या क्षेत्राचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी म्हणजे रस्त्याच्या कामाला गती येईल; अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. त्यावेळी ना.गडकरी यांनी लवकरच भूसंपादनाचे काम सुरू करू; असे आश्वासन दिले.

या शिष्टमंडळात ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, प्रितम राठोड, सम्राट खानोरे, विपीन दोभाडा यांचा समावेश होता. राष्ट्रीय महामार्ग ५१६ चे नगर जिल्ह्यातील चापडगाव ते नगर रस्त्याचे काम प्रचंड वेगाने सुर आहे. मात्र याच रस्त्यात समावेश असलेला जातेगाव ते टेंभूर्णी रस्त्याचे भूसंपादनाचे काम रखडले आहे.

सोलापूर भूसंपादन कार्यालयाने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली असून, केंद्र शासनाकडून मान्यता मिळताच तात्काळ भूसंपादन होऊन रस्त्याचे कामाला सुरूवात होणार आहे. या भूसंपादनामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. अक्कलकोट येथे आल्यानंतर नितीन गडकरी यांनी चार महिन्यात या रस्त्याचे काम सुरू करू; असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.

ही बाब शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी ना.नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ना.गडकरी यांनी तात्काळ त्यांचे स्वीय सहाय्यक बिराजदार यांना या संबंधीत सर्व फाईल तात्काळ दोन दिवसात माझ्यासमोर आणा; असे सांगितले. त्याचबरोबर कुगाव, चिखलठाण, शेटफळ, जेऊर, साडे, सालसे रस्त्यासाठी १० कोटी रूपये तसेच करमाळा, बोरगाव, घारगाव जिल्हा पोहोच रस्ता व सीना नदीवर नवीन पुल बांधणे या कामासाठी १५ कोटी रूपये व करमाळा, बोरगाव, घारगाव ते जिल्हा हद्द प्रतिमा ५ सुधारणा करणेसाठी ५ कोटी रूपये केंद्रीय रस्ते विकास निधी सीआरएफ फंडातून द्यावा; या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!