उंदरगावात प्रत्येक घरावर दिसणार नेमप्लेट

करमाळा(सुरज हिरडे) : करमाळा तालुक्यातील उंदरगावात प्रत्येक घरावर नेमप्लेट दिसणार आहे. गावातील प्रत्येक घरावर घर क्रमांक व प्रमुख व्यक्तीचे नाव असलेली नेमप्लेट ग्रामस्थांनी बसवावी असे अभियान उंदरगाव ग्रामपंचायतीकडून सुरू करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सरपंच युवराज मगर म्हणाले की, उंदरगावची आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल करण्यासाठी आम्ही गावात वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. त्यातूनच प्रत्येक घरावर नेमप्लेट असावी हे अभियान आम्ही सुरू करायचे ठरविले. यासाठी आम्ही ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःहून आपापल्या घरावर नेमप्लेट लावण्यास सुरुवात केली. या नेमप्लेटसाठी खर्च ग्रामपंचायतीकडून दिला जात नसला तरी देखील ग्रामस्थ या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. गावात ७० घरे आहेत. हळूहळू संपूर्ण गावात नेमप्लेट लावली जाईल. नेमप्लेट म्हणजे आपल्या घराची ओळख असते. नेम प्लेटवर घरातील मुख्य व्यक्तीचे नाव लिहिलेले जाते. ते आलेल्या व्यक्तीचे स्वागत करणारे व आलेल्या व्यक्तीवर छाप टाकणारे ठरते. या नेमप्लेटचा उपयोग गावात नवीन आलेल्या व्यक्तींना,पोस्टमनना, कुरियर देणाऱ्या व्यक्तीला, तसेच इतर काही कामे करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना घर शोधण्यासाठी उपयोग होऊ शकतो. या नेमप्लेटवर मुख्य व्यक्तीचे नाव, घराचा नंबर व खाली उंदरगाव ग्रामपंचायत असे लिहिण्याचा फॉरमॅट आम्ही ठरविला आहे. सर्व ग्रामस्थांनी या अभियानाला साथ द्यावी असे आवाहन सरपंच मगर यांनी केले आहे.






