३०० शब्दांचा निबंध

पप्पा बाहेर देशातच सेटल व्हायला हवं… काय आहे इथं?? ना चांगले रस्ते, ना वीज, ना पाणी आणि आता न्याय सुद्धा… 300 शब्दांचा निबंध लिहायला लावतात?? 15 तासात जामीन मिळतो??? पैसा असला की इथं काहीही होतं.. कसली लोकशाही??? नवले ब्रिजवर थोडासा स्पीड वाढला की दोन हजाराचा दंड पडतो. अनवधानाने सिग्नल मोडला की पोलीस शिट्टी मारतो. मग पी यु सी, इन्शुरन्स बघितले जातात. त्यातूनही एम एच बारा असेल तर ठीक, नाहीतर एम एच 45 वगैरे असेल तर द्या त्याला दोन तीनशे… पप्पा आता न इथे राहूच नये.. मुलगा ताड ताड बोलत होता आणि त्याच्याकडे बघता बघता मला एकदम हसू फुटले… त्यामुळे तो जाम भडकला. एक तर तो मीटिंग पूर्ण करून आलेला होता. त्यात क्लायंटने यांचे डोके खाल्लेले… त्याचे फ्रेंच मिश्रित इंग्रजी यांच्या अख्या टीमच्या डोक्यावरून चाललेले… त्यात तो क्लायंट, त्यामुळे त्यांना काहीच बोलता येत नव्हते.. आणि त्यात हा पुणे इन्सिडेंट..
खरंतर माझी एक धारणा बनत चालली आहे की आय टी वाल्यांना त्यांचा लॅपटॉप, ऑफिस टीम, आणि काम याच्या बाहेर जाऊन शांतपणे विचार करताच येत नाही.. मुळातच त्यांचा समाजाशी असणारा संपर्क हळूहळू कमी होत जातो. समाजातील प्रश्न, हे असंच चालायचं ही मानसिकता, अगतिकता,असहाय्यपण, बेकारी, खुन्नस या गोष्टींशी त्यांचा फारसा परिचय नसतो… त्यांनी कधी गावच्या आठवडी बाजारात जाऊन बाजार केलेला नसतो.. त्यामुळे तिथे मे महिन्याच्या भर उन्हात दहा पाच रुपयांसाठी दिवसभर माळवं घेऊन बसलेली माणसं पाहिलेली नसतात. यांचा परिचय डी मार्ट किंवा मॉलशी जास्त असतो. त्यामुळे समाजातील, तळातील घटकांच्या संवेदनांशी यांचा परिचय नसतो. ही तळागळातील माणसं नुसती जगत असतात. त्यांच्या देशभक्ती, सुधारणा या कल्पना अस्पष्ट असतात. कारण त्यांच्या पुढे जगणं हाच मोठा प्रश्न असतो.
त्यांच्या याच प्रश्नाचं भांडवल करून नेते, अधिकारी या लोकांवर सत्ता गाजवत असतात. बाय द पिपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल हे नुसतं राज्यशास्त्राच्या पुस्तका पुरतं ठीक असतं… इथं पीपल साठी काहीच नसतं.. तरीही या लोकांची काहीच तक्रार नसते. जसे जमेल तसे जीवनाशी झगडत ते आयुष्य पुढे पुढे सरकवत राहतात.
नेते मंडळी जनतेच्या भल्यासाठी राजकारणात येतात अशी आपण मनाची फक्त समजूत काढायची. तरुण मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून जनतेच्या भल्यासाठीच अधिकारी होतात अशीही आपण मनाची समजूत काढायची.. खरंतर इथं नेते मंडळी, अधिकारी वर्ग, मोठमोठे व्यावसायिक की ज्यांना आपण श्रीमंत मंडळी म्हणतो, यांचा काय कधी जगण्याशी लढा नसतो… त्यांना फक्त नोटा छापायच्या असतात… येणं केणं प्रकरणे फक्त धन गोळा करायचे, परदेशात प्रॉपर्टी खरेदी करायची आणि नंतर देशाच्या गांडीवर लाथ मारून तिकडे स्थायिक व्हायचं.. ही ह्यांची धोरणं… सगळेच काही असेच असतात असे मला म्हणायचे नाही पण सर्वसाधारणपणे आताचे हे चित्र आहे. हे चित्र फारसे आशादायक नाही व कधीकाळी बदलेल असे मला वाटत नाही…
मेडिकल क्षेत्रातील, आय टी क्षेत्रातील मुलं संवेदनशील असतात. पण त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांना अशा गोष्टींवर फारसा विचार करता येत नाही. ही मंडळी प्रचंड काम करून नको दुसरी झंझट या भूमिकेतून आपापले छान आयुष्य जगत राहतात… त्यांना कोणी पगारातील दोन टक्के रक्कम आम्हाला द्या असे म्हणणारे नसते.. इमारत निधीसाठी एक महिन्याचे पेमेंट द्या, वाढदिवसाला वर्गणी द्या, बिलं मंजूर करायला दहा टक्के द्या, क्लार्क ला पाच टक्के द्या, साहेबाला पाकीट द्या अशा गोष्टी माहीत नसतात…. या साऱ्याला तोंड देऊन आपण त्यातल्या त्यात खूप समाधानी आयुष्य जगत राहतो…
या साऱ्या वाईट गोष्टी आहेत, तरीही इथल्या मातीवर, गावावर, गावातील धुळीने भरलेल्या वाटांवर, पडक्या देवळांवर, शिवारावर, मारुतीच्या पारावर हरीपाठात मग्न झालेल्या म्हाताऱ्या माणसांवर आपले प्रेम आहे….. देश प्रथम या भावनेतून साऱ्या वाईट गोष्टी सोसून आपण देशाला पुढे नेण्यासाठी काम करीत राहतो…
पुढच्या पिढीला कदाचित हे समजणार नाही.. त्यामुळे 300 शब्दांच्या निबंधाचे कानावर आले की ती पिढी अस्वस्थ होते. पण त्यांचं अस्वस्थ होणं सुद्धा कुत्र्याच्या छत्रीसारखं काही काळापुरतं असतं. त्या घटनेवर काळाची जाड जुड पाने पडली की आपोआप सारे ती घटना, प्रसंग विसरून जातात…. पुन्हा नवले ब्रीज वरचा स्पीड कॅमेरा, चांदणी चौकातील ट्रॅफिक, वाकडचा मॉल, शनिवार रविवार लोणावळा तिथला भुशी डॅम यामध्येही मंडळी गुंतून जगण्याचा आनंद घेत राहतात..
✍️भीष्मा चांदणे, करमाळा 9881174988





