राजकीय द्वेष भावनेतून टेल भागाला पाणी देण्यास टाळाटाळ – सरपंच रवींद्र वळेकर

करमाळा (दि.२) : दहिगाव योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये नसलेल्या गावांना सर्रास पाणी दिले जात आहे परंतू खालच्या (टेल) भागातील लव्हे, निंभोरे,घोटी इत्यादी गावांना राजकीय द्वेष भावनेतून पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे, ६ एप्रिलपर्यंत टेल भागातील आमच्या गावांना पाणी सोडावे अन्यथा ७ एप्रिल २०२५ रोजी आम्ही करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांच्यावतीने निंभोरे गावचे सरपंच रवींद्र वळेकर यांनी कुकडी डावा कालवा उपविभागाला दिला आहे.

या विषयी अधिक माहिती देताना श्री. वळेकर म्हणाले की, करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन २० मार्चला सुरू झाले होते. १० दिवस लोटले तरी अद्याप टेल भागात पाणी पोहोचलेले नाही. उजनी धरण वेगाने वजा पातळीकडे जात असताना जाणीवपूर्वक टेल भागाला डावलले जात असून नियम पायदळी तुडवले जात आहेत. घोटी, निंभोरे, लव्हे या भागातील ग्रामपंचायतीवरती आमदार संजयमामा शिंदे यांचे वर्चस्व असल्यामुळे या भागाला राजकीय द्वेष भावनेतून डावलले जाते. त्यामुळे लेखी निवेदन दिले आहे. दि.६ एप्रिल पर्यंत टेल भागात पाणी न पोहोचल्यास ७ तारखेला रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रती माहितीसाठी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.




