अन्यथा उपळवाटे ग्रामपंचायतीला टाळे ठोकू- ज.सं. युवाध्यक्ष अक्षय देवडकर

केम (प्रतिनिधी – संजय जाधव ) : यावर्षीच्या झालेल्या पावसाळ्यानंतर ऊपळवाटे (ता.माढा) या गावातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली असून लोकांना खूप जिकरीने या रस्त्यावरून ये जा करावे लागत आहे. ग्रामपंचायतीने या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी व रस्त्यात जुनी पडलेली घरे उचलावीत. अन्यथा आम्ही उपळवाटे ग्रामपंचायतीला टाळे ठोकू अशा प्रकारचा इशारा जनशक्ती संघटनेचे माढा तालुका युवाध्यक्ष अक्षय देवडकर यांनी ग्रामपंचायतीला निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गाव ते एस टी स्टँड या रस्त्याची दुरावस्था वाढतच चालली आहे. तरीही ग्रामपंचायत लक्ष द्यायला तयार नाही. तसेच गावा बाहेरील वडार वस्ती ते बिभिषण देवडकर वस्ती हा रस्ता तर अतिशय निकृष्ट झाला आहे.या रस्त्यावरुन लहान-थोर, वृद्ध, शालेय विद्यार्थी ये-जा करत असतात. रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था वाढतच चालली आहे. तरीही ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने गावातील नागरिक संतापले आहेत. गावातील रस्त्यावर पडलेली घरे न उचलल्याने गावातील नागरिकांना ये जा करत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दत्त मंदिर पासून तानाजी गायकवाड यांच्या घराकडे जाणारा रस्त्याविषयी ही ग्रामसेवक यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी 8 दिवसात रस्त्याचे काम मार्गी लावु असे आश्वासन दिले होते, पण त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. असेच दुर्लक्ष करणे चालू ठेवले तर उपळवाटे ग्रामपंचायतीला आम्ही टाळे आम्ही ठोकु असा इशारा माढा तालुका युवक अध्यक्ष जनशक्ती संघटना व मोरया ग्रुप संस्थापक अध्यक्ष अक्षय (भैय्या) देवडकर यांनी दिला.