गावाच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग आवश्यक -भास्करराव पेरे-पाटील - Saptahik Sandesh

गावाच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग आवश्यक -भास्करराव पेरे-पाटील

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर व ग्रामपंचायत कोर्टी यांच्या संयुक्त विद्यमाने “युवकांचा ध्यास…ग्राम व शहर विकास…” हे ब्रीद घेऊन विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी कोर्टी येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

गावाचा शाश्वत विकास करावयाचा असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा आहे असे गौरव उद्गार काढले.तसेच या उद्घाटन प्रसंगी त्यांनी पाटोदा गावामध्ये राबवलेल्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना सांगितली. यावेळी ग्रामस्थांनी बैलगाडीतून त्यांची भव्य दिव्य अशी ढोल ताशा व लेझीमच्या गजरात दिंडीच्या माध्यमातून कोर्टी गावातून मिरवणूक काढली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक,माजी उपसभापती संजय जाधव, मकाईचे संचालक आशिष गायकवाड,माजी सरपंच प्रभाकर शेरे,डी.सी सी. बँकेचे माजी संचालक भर्तरीनाथ अभंग व ह.भ. प.मच्छिंद्र आप्पा अभंग फलटणचे माजी प्राचार्य सुधीर इंगळे, प्रगतशील बागायतदार बाळासाहेब काळे होते.
‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’या उक्तीप्रमाणे भास्करराव पेरे पाटील यांनी स्वतः सुरुवातीला बैलगाडीत न बसता जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनी वैष्णवी शिंदे आणि सिद्धी गिरी यांना सन्मानाने बैलगाडीत बसवून स्त्री शक्तीचा सन्मान केला.

या कार्यक्रमाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महिलांमधून व पुरुषांमधून लकी ड्रॉ च्या माध्यमातून पैठणी व संपूर्ण पोशाखाचे नियोजन करण्यात आले होते. या लकी ड्रॉ मधून गावच्या प्रथम नागरिक सौभाग्य श्री मेहेर या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर संपूर्ण पोशाखाचे मानकरी श्री आशिष शिंदे हे ठरले.

या कार्यक्रमासाठी गावच्या नूतन सरपंच सौ.भाग्यश्री मेहेर,माजी सरपंच नलिनी जाधव,शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योति शिंदे,पाणी फाउंडेशनचे आशिष लाड व प्रतिक गुरव जि.प.शाळेचे मुख्याध्यापक,विद्यार्थी, शिवाजी हायस्कूलचे सर्व शिक्षक,विद्यार्थी, हरी हरी बाबा कीर्तन संस्था कोर्टी यांचे सर्व विद्यार्थी, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक नवनाथ मोहोळकर, मस्कर ऍग्रोचे कैलास मस्कर, ज्ञानसागर कोचिंग क्लासेस चे प्रा. रोहित शिंदे,उपविभागीय अभियंता श्रीरंग मेहेर, नागराज जाधव, मेजर हनुमंत जाधव,मारुती आबा घोगरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी कोर्टी ग्रामपंचायतचे सर्व आजी-माजी सदस्य,वि.का. सोसायटीचे सर्व पदाधिकारी, यशवंत परिवारातील सर्व सदस्य,राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक,कोर्टी गावचे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुजाता भोरे यांनी केले तर आभार सचिन नवले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!