नाकाला नळी, शरीराला जोडलेली युरिन बॅग,एका हाताला सलाईन अशा स्थितीत अँबुलन्सने येत प्रेरणाने दिला बारावीचा पेपर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील बारावीची विद्यार्थिनी बुधवारी चक्क रुग्णवाहिकेतुन पेपर देण्यास आली. नाकाला नळी, शरीराला जोडलेली युरिन बॅग,एका हाताला सलाईन अशा अवस्थेत दुसऱ्या हाताने तिने बुधवारी (दि.१मार्च) रसायनशास्त्राचा पेपर दिला. यावेळी परिचारिका राजश्री पाटील यांच्या देखरेखीखाली तिने हा पेपर दिला.
प्रेरणा बाबर ही रावगाव(ता.करमाळा) येथील असून ती यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावी शिकते. ती सध्या गंभीर आजारी असल्याने खाजगी रुग्णालयात ऍडमिट होती. तिच्यावर करमाळा येथील डॉ.रविकिरण पवार, डॉ. कविता कांबळे हे उपचार करत आहेत.
बारावीचे वर्ष महत्वाचे असल्याने व उपचारातून थोडे बरे वाटल्याने तिने परीक्षा द्यायची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर केंद्र संचालक उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांनी तत्परता दाखवून या विद्यार्थिनीचे खास बैठक व्यवस्था केली. डॉक्टरांनी परिचारिका राजश्री पाटील यांना योग्य त्या सूचना देऊन रुग्णवाहिकेतुन प्रेरणाला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पाठविले.

तिने सलाईनसह, तसेच नाकाला नळी, शरीराला जोडलेली युरीन बॅग यासह रसायनशास्त्राचा पेपर व्यवस्थीत लिहीला. पेपर दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान होते. तिने केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाक, सहकेंद्र संचालक प्रा.लक्ष्मण राख, प्रा.सुवर्णा कांबळे व इतर पर्यक्षेकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच तिच्यावर उपचार करणारे डॉ.रविकिरण पवार,डॉ.कविता कांबळे परिचारिका राजश्री पाटील याचबरोबर तिला मार्गदर्शन करणारे डॉ.अमोल घाडगे, डॉ. महेश अभंग , डॉ. सुहास कुलकर्णी , डॉ. सौ वर्षा करंजकर , डॉ. सौ. शिंदे यांचेदेखील तिने आभार मानले. पेपर नंतर ती परत रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल झाली.