पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या सावडीकरांना गावच्या सुपुत्राकडून दिलासा – दीड महिन्यापासून मोफत टँकर सुरू

करमाळा (सुरज हिरडे) – मागील वर्षी पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने अनेक गावांत पाणीटंचाईची समस्या उद्भवली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावागावांत माणसांसह जनावरांचे हाल होत आहेत. करमाळा तालुक्यात अनेक गावात शासनाकडून टँकर द्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. रामदास झोळ फाउंडेशनद्वारादेखील अनेक गावांत टँकर द्वारा पाणी पुरवठा चालू आहे.याच बरोबर विविध गावातील सामाजिक कार्यकर्ते देखील पुढाकार घेऊन टँकर द्वारा पाणी पुरवून गावांची तहान भागवत आहेत. अशाच प्रकारे सावडी (ता.करमाळा) गावचे सुपुत्र व पुण्यात उद्योजक असलेले सचिन देशमुख यांनी आपल्या गावासाठी गेल्या दीड महिन्यांपासून टँकरद्वारा मोफत पाणी पुरवठा सुरू करत सामाजिक बांधिलकी जपत आहे.

सावडी गावच्या विहिरी व बोअर मार्च महिन्यापासूच आटले आहेत. त्यामुळे गावात पाण्याची भीषण टंचाई भासू लागली होती. पाण्यासाठी प्रचंड हाल होऊ लगल्यामुळे गावकरी हवालदिलं झाले होते. गावातील ही परिस्थिती लक्षात येताच गावचे सुपुत्र सचिन देशमुख यांनी आपण गावाचे काही देणं लागतो या भावनेतून व सामाजिक बांधिलकी जपत गेल्या ९ एप्रिल पासून आपल्या वडिलांच्या (कै.भगवानराव देशमुख) स्मरणार्थ दररोज मोफत पाण्याचा टँकर सुरू केला व सावडीकरांची तहान भागवली. दररोज टँकरच्या २ खेपा द्वारे सुमारे ३० हजार लिटर पाणी गावातील लोकांना दिले जात आहे.

सचिन देशमुख यांचा पुण्यात त्रिमूर्ती केटरर्स नावाने केटरिंगचा व्यवसाय आहे. याच बरोबर पुण्यातील लोणी काळभोर येथे गुलमोहर लॉन्स, हडपसर येथे इंद्रप्रस्थ लॉन्स व नेताजी लॉन्स असे मंगल कार्यालय त्यांच्या मालकीचे आहेत. देशमुख हे नेहमीच आपल्या गावाशी संपर्कात असतात तसेच गावातील विविध सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी असतात. गावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करणे, महाप्रसाद वाटप करणे, गावातील मुलांना दरवर्षी १५ ऑगस्ट,२६ जानेवारीला जेवण देणे, खाऊ वाटप, टिफीन डबे देणे, गावच्या यात्रेत, कुस्तीच्या आखाड्यात आर्थिक योगदान देणे असे सामाजिक कार्य केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत सावडी येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. उद्योजक सचिन देशमुख यांनी परिस्थिती पाहून स्वतः होऊन गावासाठी दररोज मोफत पाण्याचा टँकर गेल्या ९ एप्रिल पासून सुरू केला आहे. पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या सावडी करांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
– युवराज निकत, सावडी (ता.करमाळा)
समाजात पैसा कमावणाऱ्या अनेक व्यक्ती असतात परंतु अशाच लोकांना आदर मिळतो जे समाजातील लोकांच्या अडीअडचणीना धावून जाऊन काम करतात. सचिन देशमुख हे नेहमीच गावातील सामाजिक कार्यक्रमात भाग घेतात त्यामुळे त्यांना गावात मोठा आदर आहे. इन्सान पैसे से नहीं कर्म से बडा होता है!
– इन्नुसभाई अमरुद्दीन शेख, सावडी (ता.करमाळा)
