ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारात भाग घेतल्याबद्दल सरपंचास बेदम मारहाण
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : रावगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचारासाठी गेल्याच्या कारणावरून फुंदेवाडी येथील सरपंचास सहा जणांनी बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी किरण चंद्रकांत फुंदे (रा. फुंदेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी फुंदेवाडी येथील सरपंच असून रावगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचाराला गेलो होतो. त्याचा राग मनात धरून गोवर्धन करगळ, सुभाष पवार, धिरज करगळ, संतोष करगळ, भाऊसाहेब करगळ, हनुमंत करगळ (सर्व रा. रावगाव) यांनी दगडाने, काठीने मारहाण करून माझ्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन ओढली. तसेच माझ्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी या सर्वांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.