सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात सोहिल मुलाणी टॉप १६ मध्ये
करमाळा (प्रतिनिधी- सुरज हिरडे) : सुर नवा ध्यास नवा (पर्व ५) या कलर्स मराठी टिव्ही चॅनेलवरील संगीत कार्यक्रमांमध्ये आलेश्वर (ता. परंडा) येथील सोहील सादिक मुलाणी यांची नुकतीच टॉप १६ मध्ये निवड झाली आहे.
या कार्यक्रमामध्ये संगीतकार-गायक अवधूत गुप्ते व शास्त्रीय संगीत गायक महेश काळे हे परीक्षक म्हणून काम करत आहेत. गायक चंदन कांबळे यांनी तयार केलेली घाटोळी हा प्रकार सोहील यांनी या परीक्षकांसमोर सादर केला. या सादरी करणानंतर परीक्षकांना सोहील यांची गायनशैली आवडल्याने त्यांनी त्यांची टॉप 16 स्पर्धकांमध्ये निवड केली आहे.
सुरवातीला झालेल्या ऑडिशन कार्यक्रमामध्ये सोहील यांनी “मधूदेवा माझी जिंदगी तुझ्या नावावर” हे गीत गाऊन परीक्षकांवर प्रभाव टाकला होता. आता टॉप १६ मध्ये निवड झाली असून अजून पुढे काही राउंड होणार आहे.
सोहील मुलाणी यांचा लहानपणापासून करमाळा शहराशी फार जवळचा संबंध आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी हायस्कूल, करमाळा येथे झाले. याच वेळी ते करमाळ्यातील सूरताल संगीत विद्यालयात बाळासाहेब नरारे यांच्याकडे संगीत शिक्षण घेत होते. त्यानंतर बार्शी व बीड येथे पुढचे संगीत शिक्षण घेतले आहे. सोहील यांचे शिक्षण एम ए (म्युझिक) झाले असून ते संगीत विशारद आहेत. त्यानंतर त्यांनी कोरोना आधी २-३ वर्षे करमाळा येथेच सरगम संगीत विद्यालय सुरू केले होते. कोरोनामुळे त्यांनी संगीत विद्यालय बंद केले होते.
त्यानंतर गायक-संगीतकार चंदन कांबळे यांच्याशी सोहील यांची अनेक मैफिलीत भेट झाली होती. सोहील यांच्यातील गायनाची कला पाहून चंदन कांबळे प्रभावित झाले व त्यांनी सोहील यांना पुण्यात बोलावून टिव्ही चॅनेलवरील स्पर्धा मध्ये भाग घेण्यास मार्गदर्शन सुरू केले. सोहील यांच्या या निवडीनंतर करमाळा तालुक्यातुन त्यांचे व परिवाराचे अभिनंदन केले जात असून पुढील राउंड साठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.