करमाळ्यातील तरुण बेपत्ता नसून किल्ला वेस येथील बारवेत आढळला मृतदेह
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.६) : करमाळा शहरातील साठेनगर भागातील तरुण बेपत्ता झाला आहे, असे समजून परिवारातील नातेवाईकांनी पोलीसात हरवल्याची तक्रार दिली होती, परंतु हा तरुण बेपत्ता नसून करमाळा शहरातील किल्ला वेस येथील जुन्या अस्वच्छ असलेल्या बारवेत तरंगत असलेला त्याचा मृतदेह आज (ता.६) सकाळी आढळून आला आहे.
अमोल बारीकराव आलाट (वय – ३३, रा. साठेनगर, करमाळा) असे या तरूणाचे नाव असून तो काहीही न सांगता घरातून बाहेर निघून गेला होता, त्याचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो न सापडल्याने पोलीसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. परंतु त्याचा आज सकाळी पाण्यात मृतदेह आढळून आला.
मागील तीन ते चार दिवसापासून सदरचा मृतदेह हा पाण्यात असल्याने तो फुगून वर आला होता, तसेच त्याची दुर्गंधी येत होती. त्यामुळे परिसरातील महिलांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी करमाळा पोलीसात ही माहिती दिली, त्यावरून पोलीस त्या घटनास्थळी आले व मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी पाठवला. या घटनेत आत्महत्या आहे की, दुसरे कारण आहे हे अद्याप समजले नसून याप्रकरणी करमाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.