ट्रक्टरची स्कुटीला धडक - मायलेकी जखमी.. - Saptahik Sandesh

ट्रक्टरची स्कुटीला धडक – मायलेकी जखमी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : ट्रॅक्टर चालकाने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर हयगयीने व भरधाव वेगाने चालवून एका स्कुटीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने स्कुटीवरील मुलगी व तिची आई गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार २४ नोव्हेंबरला झरे- वीट रस्त्यावर घडला आहे. या प्रकरणी गणेश रामदास खराडे (वय-३२) याने करमाळा पोलीसात फिर्याद दिली.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की २४ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मी बारामती येथे असताना मला माझा मावसभाऊ किशोर कृष्णा रायगुडे याचा फोन आला, की तुझी बहिण लतिका नागनाथ भोसले ( वय – ३७) व मंगल रामदास खराडे (वय ५५) या स्कुटीने जात असताना त्यांना अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टर चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र. एमएच ४५ एफ ९४९९ हा भरधाव वेगाने चालवून स्कुटीला पाठीमागून धडक दिल्याने बहिण लतिका हिच्या पायावरून चाक गेले आहे.

तसेच आईला अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्राथमिक उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. परंतू डॉक्टरांनी पायातून जास्त रक्तस्त्राव झाल्याने लतिका हिला पुणे येथे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!