घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून ७० हजाराची चोरी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : जातेगाव (ता. करमाळा) येथे एका घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी ६० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठन व रोख रक्कम १० हजार रूपये असा एकूण ७० हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी आदेश उर्फ दादासाहेब शिंदे यांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की ३० नोव्हेंबर रोजी मी व माझा भाऊ सकाळी दहा वाजता शेतात गेलो. शेतातून काम करून घरी आलो व नंतर घराला कुलूप लावून करमाळा येथे कामानिमित्त आलो. त्यानंतर मला माझ्या मुलीचा फोन आला की, आपल्या घरी चोरी झाली आहे. मी तातडीने माझ्या भावाला फोन करून घरी जाण्यास सांगितले, तर त्याने घरी जाऊन पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले व कपाटातील ६० हजार रूपये किंमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे गंठन व रोख रक्कम १० हजार रूपये तेथे दिसून आली नाही. यावरूनच कोणीतरी अज्ञात चोरट्याने ही चोरी केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी करमाळा पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.