ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड “मेघदूत ” पुरस्कारानं सन्मानित

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड यांना बार्शी येथील कवी कालिदास मंडळानं “काडवान” या कविता संग्रहासाठी “मेघदूत ” पुरस्कार देवून सन्मान केला आहे.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद दास हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयकुमार शितोळे हे होते. या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवी लावंड यांना हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी परिक्षक प्रा.प्रमिला देशमुख यांनी “काडवान” या कविता संग्रहातील कवितांची सौंदर्य स्थळं उलगडून दाखवताना या संग्रहातील कवितांचा सविस्तर धांडोळा घेतला.
प्रकाश लावंड यांनी आपल्या मनोगतातून आपल्या काव्य प्रेरणांचा व काव्य वाटचालीचा पट उलगडून दाखवला. या कार्यक्रमाला कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे, प्रकाश गव्हाणे, प्रा.प्रमिला देशमुख,दत्ता गोसावी, शब्बीर मुलाणी, कवी खलील शेख, कवी ओडिसियस,गझलकार नवनाथ खरात, किरण गायकवाड, प्राचार्य नागेश माने, रिझर्व बँकेचे निवृत्त अधिकारी गणेश चिंचोले आणि श्री लावंड यांच्या कुटुंबियांसह मोठ्या प्रमाणात काव्य रसिक हजर होते. कवी प्रकाश लावंड यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शनैश्वर दिंडी सोहळा संस्था व ग्रामसुधार समिती या दोन संस्थाच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला आहे.


