यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या उत्साहवर्धक प्रतिसादामध्ये स्टार्ट अप यात्रा संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थी आणि करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या मनात सुप्त स्वरूपात असलेल्या उद्योगविषयक नव्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या “स्टार्ट अप” यात्रेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या यात्रेच्या सकाळी साडेसात वाजता स्टार्ट अप यात्रेच्या सुसज्ज वाहनास विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल्. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजी किर्दाक, लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड प्रभृतींनी हिरवा झेंडा दाखवून स्टार्ट अप यात्रेचा प्रारंभ केला.
करमाळा तालुक्यातील वीट येथे सदर वाहनाने भेट देवून स्टार्ट अप यात्रेचे स्वरूप समजावून सांगितले व ग्रामस्थांना पत्रके वाटली. सकाळी दहा वाजता महाविद्यालयातील विजयश्री सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये यशस्वी उद्योजकांची मनोगते, नवीन संकल्पनांच्या सादरीकरणाची स्पर्धा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल्. बी. पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विचारमंचावर विद्या विकास मंडळाचे सचिव श्री विलासराव घुमरे, करमाळा पंचयत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत,इन्क्युबेशन सेंटरचे सर्वश्री डॉ. सचिन लढ्ढा, व्यवस्थापक श्रीनिवास पाटील, व्यवस्थापक श्रीनिवास नलगेशी, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजी किर्दाक हे मान्यवर उपस्थित होते.
सदर सभेमध्ये विलासराव घुमरे सतकारी नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या पिग्मी कलेक्शन आणि गरजू उद्योजकांना देण्यात येत असलेल्या कर्ज पुरवठ्याची यशोगाथा प्राचार्य मिलींद फंड यांनी विशद केली तर प्रा.सौ.सुजाना भोरे यांनी सौ. जयश्रीताई घुमरे महिला बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीतून महिला सक्षमीकरण, महिलांसाठी पर्यटन इत्यादी अभिनव उपक्रमांची उतम पद्धतीने माहिती दिली. सुप्रिया पवार या विद्यार्थिनीने व अबुतालिब शेख या विद्यार्थ्याने आपल्या मनातील नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रभावीपणे सादरीकरण करून सर्व मान्यवरांची दाद मिळवली. गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी तरुणाईच्या भाषेत बदलते जीवन आणि बदलते उद्योग- व्यवसाय व बदलती व्यावसायिक धोरणे आणि डावपेच यांचे सविस्तर विवेचन केले.
विलासराव घुमरे यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यवहारज्ञान आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता यांचे महत्त्व प्रतिपादन करताना अनेक उदाहरणे देवून कुणीही आपल्या गरीबीचे प्रदर्शन आणि भांडवल करू नका असा संदेश देवून श्रोतृवृंदास अंतर्मुख केले. इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लढ्ढा यांनी अनेक उदाहरणे देवून जीवनात यशस्वी उद्योजक कसे होता येवू शकते हे सोदाहरण पटवून दिले. अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ. पाटील यांनी सर्व वक्त्यांच्या भाषणांचा सुयोग्य पद्धतीने परामर्ष घेतला. ज्यांनी नव्या संकलना सादर केल्या त्या विद्यार्थ्यांचे कौतूक केले आणि नवीन कल्पना आपले जीवन कशा प्रकारे बदलून समृद्ध करू शकतात हे पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कृष्णा कांबळे यांनी केले. स्टर्ट अप यात्रा या उपक्रमाचे मह विद्यालयातील समन्वयक प्रा. प्रदीप मोहिते यांनी सूत्रसंचालन केले तर उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. विजयराव बिले, प्रा. अभिमन्यू माने,प्रा. गौतम खरात, प्रा. प्रमोद शेटे, प्रा. हनुमंत भोंग, प्रा. मुन्नेश जाधव, प्रा. ओंकार साळुंखे, हनुमंत सुतार, सूरज माहुले आणि अजिंक्य जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.
