
करमाळा / संदेश प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे गुरुजी व पं. विष्णू दि. पलुसकर गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १२ वा आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत महोत्सव व पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात संपन्न झाला. महोत्सवाचे उद्घाटन सोनियाताई जयकुमार गोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आले.
यावेळी बोलताना सोनियाताई जयकुमार गोरे म्हणाल्या, “गेली २९ वर्षे सुरताल संगीत विद्यालय संगीत शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. संगीतामुळे मनाला शांती व स्थिरता मिळते. विद्यालयाच्या प्रगतीसाठी भविष्यात कोणतीही गरज भासल्यास आम्ही सदैव पाठीशी राहू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी यशकल्याणी संस्थेचे गणेश करे-पाटील, करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत तसेच ग्लॅमोवेल वेलनेस, पुणे यांच्या संस्थापिका डॉ. प्रचिती पुंडे यांनी मनोगत व्यक्त करून सुरताल संगीत विद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले. महोत्सवात सुरताल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह विविध राज्यांतून आलेल्या कलाकारांनी गायन, वादन व नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. यावेळी संगीत, नृत्य व भारतीय कला-संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांचा सुरताल पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
डॉ.श्रद्धा जवंजाळ यांना संस्थेचा मानाचा ‘सुरताल संगीत रसिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच डॉ. सुनीता टिकारे, ज्योती दास, देबाश्री मुखर्जी, बिजिता गोस्वामी, तनमना चौधरी, मृदुस्मिता दत्ता, स्निग्धा टाईड आणि भाग्यश्री पेंधे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व पुरस्कारार्थींना पैठणी साडी भेट देण्यात आली. या कार्यक्रमास श्री. विलासरावजी घुमरे, प्राचार्य मिलिंद फंड, श्री. कन्हैयालाल देवी, श्री. श्रेणिक शेठ खाटेर, जि.प. सदस्या अश्विनीताई चिवटे, डॉ. हेमा शिराळ, सौ. सुनीता देवी, श्री. भारतभाऊ शिंदे-पाटील आणि संतोष शेठ शियाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. बाळासाहेब पिसे, भाजपचे लक्ष्मण केकान, महादेव अण्णा फंड, डॉ. महेंद्र नगरे, नगरसेविका स्वातीताई फंड, डॉ. स्वाती घाडगे, विष्णू शिंदे, कल्याणराव साळुंके, कल्याण फंड, बाळकृष्ण लावंड, अशोक बरडे, अक्रूर शिंदे, सतीश वीर, संतोष पोतदार, दिगंबर पवार, पाटील सर, पत्रकार दिनेश मडके, किरणकुमार नरारे, नवनाथ थोरात, किशोर नरारे आणि ज्योती मुथा यांच्यासह विद्यार्थी, पालक व महिला संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमला भवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब नरारे यांनी केले. सूत्रसंचालन संध्या थोरे, रेशमा जाधव व अर्चना सोनी यांनी केले, तर आभार सौ. साक्षी नरारे यांनी मानले.
