
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२९: सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या जाळ्यात अनेक निष्पाप नागरिक अडकत असतात. करमाळा तालुक्यातील वीट येथील उद्योजक तेजस रघुनाथ ढेरे यांनी दाखविलेले धाडस आणि प्रामाणिकपणा यामुळे एका निष्पाप वारकऱ्याचे ३० हजार रुपये परत मिळाले आहेत. हॅकरकडून वारंवार धमक्या येऊनही त्यांनी पैशांचा मोह टाळत खरी रक्कम मूळ मालकाला परत करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील जालिंदर मच्छिंद्र भागवत यांना सायबर भामट्यांचा फोन आला. तुमच्या खात्यात चुकून ३५ हजार रुपये आले ते परत पाठवा. त्याचबरोबर ३५ हजार रुपये क्रेडिट झाल्याचा फेक मेसेज देखील पाठवण्यात आला. श्री. भागवत यांनी खातरजमा न करता ती रक्कम हॅकरच्या सूचनेवरून स्कॅनरवर पाठवली.
भागवत यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत दुसऱ्या दिवशी परत हॅकरने भागवत यांना कॉल करून तीस हजार रुपये चुकून आल्याचे सांगितले व ३० हजार रुपये क्रेडिट झाल्याचा फेक मेसेज पाठवला. यावेळी मात्र त्याने ती रक्कम तेजस ढेरे यांच्या फोन पे वर सोडायला सांगितली कारण तेजस ढेरे यांच्या सोबत देखील हॅकरचा असाच प्रयोग सुरू होता. तेजस ढेरे यांना देखील 50 हजार रुपये क्रेडिट झाल्याचा फेक मेसेज पाठवण्यात आला. तेजस ढेरे यांना फोन कॉल करून 50 हजार रुपये क्रेडीट झाले असल्याचे सांगितले व स्कॅनरवर पाठवायला सांगितले.
तेजस ढेरे यांनी आपल्याला फक्त तीस हजार रुपये आले असल्याचे सांगितले व पन्नास हजार रुपये पाठवल्याचा मेसेज फेक असल्याचे देखील त्यांना लक्षात आले. त्यामुळे ढेरे यांनी ही रक्कम देण्यास नकार दिला. ३० हजारांची रक्कम मिळविण्यासाठी दोन दिवस हॅकरकडून ढेरे यांना सतत फोन करून धमक्या व दबाव टाकण्यात आला; मात्र ढेरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

भागवत यांनी ज्यावेळी आपल्या खात्यातील बॅलन्स चेक केला त्यावेळी आपल्या खात्यातून रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी ढेरे यांना संपर्क केला. तेजस डेरी यांनी आपल्याला रक्कम मिळाली असून ती तुम्हाला परत करू असे आश्वस्त केले.
त्यानंतर भागवत हे दिनांक २९ जुलैला करमाळा येथे आले. तेजस ढेरे यांनी अॅड. डॉ. बाबुराव हिरडे, राजू घळके, युवासेना तालुकाप्रमुख शंभुराजे फरतडे, दत्तात्रय शिर्के आणि अजय साखरे यांच्या उपस्थितीत ₹३० हजारांची रक्कम रोख स्वरूपात जालिंदर भागवत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
दीर्घकाळ वारी करणारे जालिंदर भागवत यांना पैसे परत मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. “आज माझी इतक्या वर्षांची वारी सार्थकी लागली. अजूनही समाजात प्रामाणिक माणसं आहेत,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यावेळी तेजस ढेरे म्हणाले, “कोणी काहीही म्हणो, पण मी माझा चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा कधीच सोडणार नाही. दुसऱ्याचे पैसे स्वतःकडे ठेवणे माझ्या संस्कारात नाही.”
सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये अनेकदा लोक भीतीपोटी किंवा लोभापोटी चुकीचे निर्णय घेतात. अशा काळात तेजस ढेरे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा, नैतिकता आणि धाडस हे समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

